रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अटळ?

उद्या निर्णय अपेक्षित

(संग्रहित छायाचित्र)

उद्या निर्णय अपेक्षित

मुंबई : गेली पाच वर्षे न मिळालेली भाडेवाढ आणि करोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे परिवहन विभागाने काळ्या-पिवळ्या रिक्षासाठी किमान २ रुपये, तर टॅक्सीसाठी ३ रुपये भाडेवाढ प्रस्तावित केली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवार, २२ डिसेंबरला होणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीसाठी खटुआ समितीचे सूत्र वापरले जाणार आहे. या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्याने त्यातील भाडेदरासंदर्भात शिफारशींवरही होणाऱ्या बैठकीतही चर्चा केली जाणार आहे. शिफारशींमध्ये टॅक्सीसाठी सवलतींचे आठ टप्पे, तर रिक्षासाठी चार टप्पे, काळ्या-पिवळ्या टॅक्सी सेवेत आठ किलोमीटरच्या पुढील टप्प्यासाठी १५ ते २० टक्के सवलत, भाडेदर दोन पटींपर्यंतच वाढवण्याची मुभा, मुंबई महानगर क्षेत्रात मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत रिक्षा-टॅक्सीला भाडेवाढ नाही इत्यादींचा यात समावेश असेल.

भाडेवाढीसंदर्भात २२ डिसेंबरला परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा होणार असून समितीकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

यापूर्वी रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ प्रत्येक वर्षी जूनमध्ये सरकारने नेमलेल्या हकीम समितीच्या सूत्रानुसार होत होती. या भाडेवाढीबाबत प्रवासी नाराजी व्यक्त करत असत. मात्र सरकारने हकीम समिती बरखास्त करून त्याऐवजी एकसदस्य खटुआ समिती स्थापन केली. या समितीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ३०० पानी अहवाल सादर केला होता. त्यानंतर हा अहवाल स्वीकारण्यास काही कालावधी लागला होता. भाडेवाढीबाबत याच समितीचे सूत्र व शिफारशी लागू करण्यावर आता विचार के ला जात आहे. मुंबई ग्राहक पंचायतीनेही भाडेवाढीला विरोध दर्शविलेला नाही. परंतु प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री नको, अशी सूचनादेखील के ली आहे.

दरवाढ अशी..

सध्या काळ्या-पिवळ्या रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये, तर टॅक्सीचे २२ रुपये भाडे आहे. रिक्षाच्या भाडेदरात दोन रुपये आणि टॅक्सीच्या भाडेदरात तीन रुपयांची वाढ प्रस्तावित के ली आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे २० रुपये आणि टॅक्सीचे भाडे २५ रुपये होईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र प्राधिकरणाच्या बैठकीत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbaitaxi and auto rickshaw fares likely to be hiked by rs 2 and 3 zws