मुंब्रा येथील एम एम व्हॅली मित्तल रोडवर एका स्कूटरवर चक्क सहा लोक बसून स्टंट करतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या विरोधात कठोर पाउले उचलली आहेत. या रोडवर नेहमीच बाईकस्वार स्टंटबाजी करत असतात. अशातच हा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सहा जण एकाच स्कूटीवर बसून स्टंट करताना दिसून येत आहे. तसेच या दुचाकीवर सीटवर जागा होत नसल्याने चालू गाडीवर एकमेकांच्या अंगावर बसून हा स्टंट केला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे हा व्हिडियो गंभीर असून त्यामुळे स्वतःचा आणि सह प्रवाश्यांचा जीव देखील धोक्यात घातला आहे. गाडीच्या नंबरप्लेटच्या मदतीने गाडीमालकाचा पत्ता शोधण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असून नवीन वाहन दंड नियमांच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आणि अशा घटनांवर चाप बसावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली असल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

“मित्तल कपाऊंटच्या रोडवर काही अल्पवयीन मुले स्टंट करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाडीच्या मालकाचा तपास सुरु करण्यात आला आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देणाऱ्या वाहन मालकास मोठ्या प्रमाणात दंडाच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. संबधित वाहन मालकावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे स्टंट करणारे आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. अशा प्रकारचा स्टंट आणि अशा प्रकारच्या गाड्या आपल्या जवळच्या लोकांना देणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे पालकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा योग्य कारवाई केली जाऊ शकते,” अशी प्रतिक्रिया ठाणे वाहतूक पोलीस शाखाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra mittal road bike stunt police should take action against abn
First published on: 18-01-2022 at 18:25 IST