खार पश्चिम येथील खार जिमखान्यालगत असलेल्या एका भूखंडावर पालिकेच्या प्रसूतिगृहाची एक दिमाखदार इमारत गेली तीन वर्षे रिकामी उभी आहे. या इमारतीच्या दरवाजावर प्रसूतिगृहासाठी हस्तांतरित असा फलकही आहे. तथापि महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजपर्यंत या इमारतीत प्रसूतिगृह सुरू केलेले नाही. श्रीमंतांच्या वस्तीमध्ये गरिबांचे प्रसूतिगृह सुरूच होऊ नये यासाठीच ही इमारत रिकामी ठेवल्याचा आरोप आता होत असून पालिकेनेच याबाबत दिलेली माहिती या आरोपाला पुष्टी देणारी आहे.
खार जिमखान्याजवळ असलेल्या भूमापन क्रमांक ई-१२०, पीएफ क्र. ६५७, टीपीएस-३, १६ वा रस्ता येथील जागेवर प्रसूतिगृहाचे आरक्षण होते. २००६ साली या जागेवर खाजगी इमारत व त्यालगत प्रसूतिगृह बांधण्याच्या प्रस्तावाला महापालिकेने मान्यता दिली. या अंतर्गत महापालिकेने १८ सप्टेंबर २००६ रोजी ठराव क्रमांक ५५२ मंजूर केला. या ठरावानुसार एकूण क्षेत्रफळाच्या २५ टक्के भूभागावर म्हणजे ३५८.५० चौरस मीटरवर संबंधित मालकाने पालिकेला प्रसूतिगृह बांधून द्यायचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सदर जागेवर संबंधित मालकाने पाच मजली प्रसूतिगृहाची उत्तम इमारत बांधून दिली व उर्वरित जागेवर आलिशान इमारत बांधण्यात आली. सदरचे प्रसूतिगृह महापालिके ला २०१२ साली विकासकाने हस्तांतरितही केले. मात्र तेव्हापासून पालिकेने या जागेचा काहीही उपयोग न करता ती रिकामी ठेवणेच पसंत केले. मनसेचे वांद्रे विधानसभेचे विभाग अध्यक्ष तुषार आफळे यांनी याबाबत सातत्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तसेच अतिरिक्त आयुक्तांकडे पाठपुरावा केला. वांद्रे विधानसभेत प्रसूतिगृह तसेच महिलांसाठी रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता असताना सदर इमारत रिकामी का ठेवण्यात आली याबाबत विचारणा करूनही पालिकेकडून उत्तर देणे टाळले जात होते.
माहितीच्या अधिकारातही आफळे यांनी पाठपुरवा केल्यानंततर अखेर १७ ऑक्टोबर २०१५ रोजी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने जे उत्तर दिले आहे त्यातून पालिकेच्या कारभाराचा पंचनामा समोर आला आहे. उत्तरात पालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणतात, संबंधित जागेविषयी कोणतेही नियोजन नसल्यामुळे या इमारतीचे क्षेत्रफळ हे प्रसूतिगृहाच्या वापरासाठी अपुरे आहे. त्यामुळे तेथे प्रसूतिगृह सुरू करण्यात आले नसून या इमारतीत आता ‘आयव्हीएफ’ केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
मुदलात ज्या वेळी पालिकेने हा ठराव मंजूर केला तेव्हाच या जागेवर प्रसूतिगृह बांधले जाणार हे स्पष्ट होते. जागेचे क्षेत्रफळही निश्चित होते. आता पाच मजली इमारतीत प्रसूतिगृह सुरू न करण्यामागे केवळ स्थानिक श्रमंतांचा असलेला अडसर कारणीभूत असल्याचे तुषार आफळे तसेच काही स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘आयव्हीएफ’ केंद्र ही शुद्ध फसवणूक असून या घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे आफळे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.