महानगरपालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ अहवाल प्रकाशित

मुंबई: पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना नाल्यांतून गाळांपेक्षा कितीतरी जास्त प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. एकल वापराच्या प्लास्टिकचे सर्वात मोठे आव्हान मुंबई महानगरपालिकेपुढे आहे. प्लास्टिकचा वापर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सक्ती आणि कारवाई सुरू आहे. मात्र केवळ प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र नागरिकांनी शिस्त बाळगावी, सजगतेने कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल – २०२५-२६’ गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पर्यावरण संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरपूर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी यंदाच्या वातावरणीय अर्थसंकल्पात भांडवली आणि महसुली खर्चात वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. तथापि, एकल वापराच्या प्लास्टिकला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही स्वयंशिस्तीने कापडी किंवा कागदी पिशव्यांच्या वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात आयोजित प्रकाशन सोहळ्यास उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) राजेश ताम्हाणे, प्रमुख अभियंता अविनाश काटे आदी उपस्थित होते.

मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (MCAP) वातावरणविषयक ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आली आहेत. ही लक्ष्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २०२४-२५ पासून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात येत आहे. यंदा या अर्थसंकल्प अहवालाचे दुसरे वर्ष आहे. वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबत जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे (C-40 Cities) या उपक्रमांचा मुंबईसुद्धा एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहराशी संबंधित प्रशासनाकडून वातावरण अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अशाप्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणासाठी तरतूद

• वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसूली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ४३,१६२.२३ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजापैकी १६,३२१.३३ कोटी रुपयांची (३७.८१ टक्के) तरतूद ही वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित आहे. २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ही तरतूद वाढवून ५९.६४ टक्के करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण ३१,७७४.६४ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजात १०,२२४.२४ कोटी रुपयांची तरतूद (३२.१८ टक्के) वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित होती.