मुंबई: पवई तलावातील जलपर्णीची बेसुमार वाढ रोखण्यासाठी तलावातील सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच या नदीच्या काठावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या दोन कामांसाठी स्वतंत्र निविदा मागवण्यात आल्या असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. त्यामुळे या कामासाठी पुढील आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत. तसेच तलावातील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

मागील काही दिवसांपाूसन पवई तलावात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. जलपर्णीने तलावाचा पृष्ठभाग व्यापला आहे. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता, तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. एवढेच नव्हे तर सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होऊन तलावातील माशांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ खुंटते आणि अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो.

पाण्याची गुणवत्ता खालावते. या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच या प्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रारही केली होती. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली.

या उपाययोजना करणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रकल्प खात्यामार्फत २ निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सा:रण वाहिनी टाकणे आणि ८ दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे. पवई तलावात १८ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह येतो. त्यापैकी ८ दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा तलावात टाकण्यात येईल. तसेच, उर्वरित ८ दशलक्ष लीटर सांडपाणी आदि शंकराचार्य मार्गावरील अस्तित्वात असलेल्या मलनिस्सा:रण वाहिनीद्वारे भांडुप येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. उर्वरित २ दशलक्ष सांडपाणी पेरू बाग येथील उदंचन केंद्राकडे वळवून मलनिस्सारण वाहिनीद्वारे मिठी नदीवरील ९ दशलक्ष लीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. यामुळे, पवई तलावात येणाऱ्या सांडपाण्याच्या प्रवेशाला अटकाव करून वळवणे यासाठी मदत होणार आहे. या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यादेश पुढील आठवड्यात द्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

५ हजार मेट्रीक टन जलपर्णी हटवली

पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरू आहे. सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. त्यामुळे जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाली आहे. तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे बांगर यांनी सांगितले.

जलपर्णी काढण्याचा वेग वाढवणार

जलपर्णी काढण्याची कार्यवाही सध्या दोन संयंत्राद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ पाच संयंत्रांच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग द्यावा. पावसाळ्यानंतर ६ संयंत्रे तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर क्षेपणभूमीवर विनाविलंब विल्हेवाट लावावी, त्यासाठी वहन व्यवस्था सक्षम करावी, अशाही सूचना बांगर यांनी केल्या.

पर्यावरण अभ्यासकांची मदत घेणार

तलावातून जलपर्णी काढताना जैवविविधतेस कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जाणार आहे. जलपर्णी काढण्याच्या कार्यवाहीत निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी केलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. या सूचनांचा योग्य समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये करावा, यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या प्रतिनिधींनी तलाव क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवई तलाव येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी या पक्ष्यांचा प्रजोत्पादन / विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्याची दखल घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांच्यासमवेत संवाद साधावा. त्यांच्याशी समन्वय साधूनच व सल्ल्यानुसारच जलपर्णी काढण्याचे काम करण्यात यावे. तज्ज्ञांसमवेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पवई तलावास प्रत्यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी करावी, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.