मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच महापालिकेने ठिकठिकाणचे बॅनर्स, फलक, झेंडे उतरविण्याची मोहीम हाती घेतली. आता होळी आणि रंगपंचमीनिमित्त अनधिकृतपणे बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सभा, कार्यक्रम, आंदोलने आदीचे निमित्त साधून मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात फलक, बॅनर्स आणि झेंडे उभारण्यात आले होते. या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान महापालिका क्षेत्रांतील फलस, बॅनर्स २४ तासांमध्ये काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर महापालिकेने मुंबईमधील बॅनर्स युद्धपातळीवर काढले. परंतु आजही अनेक भागात बॅनर्स झळकताना दिसत आहेत. आता होळी आणि रंगपंचनी निमित्त अनधिकृतपणे बॅनर्स झळकविणाऱ्यांच्या विरोधात पालिकेने दंड थोपटले आहेत. या उत्सवादरम्यना झळकविण्यात येणारे बॅनर्सची पाहणी करण्यासाठी विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. अनधिकृत बॅनर्स जप्त करण्याची कारवाई ही पथके करणार आहेत. तसेच फलकबाजी करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटल दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.