मुंबई – मुंबईकरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भांडूप येथे असलेल्या मुंबई महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करण्यात येणार आहे. तब्बल ४६ वर्षे जुन्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागी नवीन जास्त क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मुंबई महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. विशेषतः शहर आणि पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भांडूप पश्चिमेकडे असलेल्या पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात येणार असून २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर मुंबई महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी या प्रकल्पाची पाहणी केली. भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसेच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुमारे ४६ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. हा प्रकल्प संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्याने २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पात दररोज २,००० दशलक्ष लीटर (MLD) पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगर व शहर विभागमध्ये पाणीपुरवठा करणाऱया भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. एप्रिल २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम कसे चालते
शहराच्या बाहेर कित्येक किमी अंतरावर असलेल्या धरणांतील पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्यत: दोन प्रणाली आहेत. त्यापैकी एका प्रणालीतून तानसा – वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून गुरूत्वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते.
धरणातील पाणी २४०० मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या कॉंक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षद्वारे पांजरापुर व भांडुप संकुल येथे आणले जाते. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुक केले जाते व तेथून एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. मात्र जलशुद्धीकरण करणारा हा प्रकल्प पालिकेने ४४ वर्षांपूर्वी उभारलेला असून त्याचे आयुर्मान आता संपत चालले आहे. हा प्रकल्प संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला असून त्याचे वापरण्यायोग्य आयुर्मानही संपत चालले आहे. त्यामुळे पालिकेने भांडूप संकुल परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्याचे ठरवले आहे.

