मुंबई : राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी बहुतांश शहरांतील स्थानिक प्रशासनाने काही काळ प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली. ग्रामीण भागांत मात्र शाळा नियोजनाप्रमाणे आज, बुधवारपासूनच सुरू होणार आहेत.

दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर शिक्षण आणि आरोग्य विभागाने पहिलीपासूनचे वर्ग बुधवारपासून (१ डिसेंबर) सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीमुळे बहुतेक महापालिकांनी परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील शाळा बुधवारपासून सुरू होणार असल्या तरी शहरी भागांतील पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना मात्र अजून काही दिवस ऑनलाइन वर्गानाच हजेरी लावावी लागणार आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथील शहरी भागांतील शाळा १० डिसेंबरनंतर सुरू होणार आहेत.

बाधित नसल्याच्या अहवालाचा पेच

शिक्षक, कर्मचाऱ्यांना गेल्या ४८ तासांतील करोना चाचणीचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक, कर्मचारी बाधित नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, चाचणी दर दोन दिवसांनी करायची का, एकदाच चाचणी झाल्यानंतर शिक्षक बाधित होणार नाहीत असे गृहीत धरायचे का, असे प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबतचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी शाळेत जाताना चाचणी अहवाल कसा द्यायचा, असा प्रश्न ग्रामीण भागांतील शिक्षकांना पडला आहे.

यंत्रणा उभी करण्यासाठी वेळ आवश्यक : शहरातील बहुतेक शाळांमध्ये एका वर्गात पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. अशावेळी ऑनलाइन, ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात शिक्षण देणे, अंतराची अट पाळून वर्ग भरवण्याची व्यवस्था करणे, वाहतुकीची व्यवस्था, शाळांची स्वच्छता, शिक्षकांचे लसीकरण अशा बाबींची तयारी करण्यासाठी शाळांनाही काही वेळ मिळणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाळा कुठे, कधी सुरू?

* मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर, पुणे जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १५ डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शाळा तात्काळ सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

* कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमधील शाळांबाबत मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र, तेथील शाळाही १५ डिसेंबरनंतर सुरू होण्याचे संकेत आहेत.

* नागपूर शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आता १० डिसेंबपर्यंत बंद राहणार असून, त्यानंतर करोनास्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.