मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग म्हणजेच सुप्रसिद्ध इर्ला मार्केट परिसरात मुंबई महापालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. या भागातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने गुरुवारी हटवली. त्यामुळे नेहमी गजबजलेला हा परिसर थोडा मोकळा झाला आहे.
अंधेरी (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग आणि गुलमोहर मार्गाला जोडून असलेल्या तसेच डॉ. रु. न. कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गाशी संलग्नित राम गणेश गडकरी मार्गावरील (इर्ला मार्ग) पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे गेल्या काही वर्षात तयार झाली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे, कूपर रुग्णालयात रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही गर्दीतून मार्ग काढणे अशक्य बनले होते. तसेच पादचाऱ्यांना पदपथांवरुन चालण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ प्रशासकीय विभागाकडून अनधिकृत बांधकामाविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेंतर्गत या परिसरातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामे हटवण्यात आली.
अतिक्रमण निर्मूलनाची ४ वाहने, ३ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १०० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईमुळे या परिसरातील पदपथ रस्ते मोकळे झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पालिकेची यंत्रणा दूर गेल्यानंतर फेरीवाले लगेचच पुन्हा उगवतात. त्यामुळे तसे होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आगामी काळातही अनधिकृत बांधकामांविरोधात नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कुर्ला, भांडूप, मुलुंडमध्ये कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा जागेवरच
दरम्यान, कुर्ला आणि भांडूप स्थानकाबाहेर झालेल्या बेस्टच्या मोठ्या अपघातानंतर मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली होती. मात्र काही महिन्यांनी हे फेरीवाले पुन्हा एकदा तेवढ्याच संख्येने दिसू लागले आहेत. अशीच व्यथा मुलुंडमधील रहिवाशांची देखील आहे. मुलुंडपश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले.
पालिकेची कारवाई ही दिखाऊपणाची असल्याची चर्चा येथील रहिवाशांमध्ये आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवले आहेत तर रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने उभी केल्यामुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

