निवडणुकींची आतषबाजी सुरू | Loksatta

निवडणुकींची आतषबाजी सुरू

राज्य निवडणूक आयोगाने १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकींची आतषबाजी सुरू

२१२ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर ते ८ जानेवारी दरम्यान चार टप्प्यांत मतदान; आचारसंहिता लागू

राज्यातील २१२ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स. सहारिया यांनी सोमवारी जाहीर केला. त्यानुसार २६ जिल्हय़ांमध्ये संपूर्ण आणि ७ जिल्हय़ांमध्ये अंशत: आचारसंहिता लागू करण्यात आली आली असून या कालावधीत खासदार, आमदार व नगरसेवकांना स्थानिक विकास निधी खर्च करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारला मतदारांवर प्रभाव पडेल, अशा कोणत्याही नवीन योजना जाहीर करता येणार नाहीत, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाने १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २७ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या दरम्यान चार टप्प्यांत मतदान होणार आहे. या वेळी १९२ नगरपालिकांच्या नगराध्यक्षांसाठी थेट निवडणूक होणार आहे. राज्यात राजकीय वादळ निर्माण करणारे मराठा आंदोलन आणि अन्य समाज घटकांतही त्याच्या उमटत असलेल्या प्रतिक्रियांच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे. राज्य सरकारने अलीकडेच कायद्यात सुधारणा केल्याप्रमाणे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर मतदारांना एका प्रभागातील नगरसेवकांबरोबर नगराध्यक्षपदासाठी मतदान करावे लागणार आहे.

३३ जिल्ह्य़ांत निवडणूक

मुंबई शहर व उपनगर जिल्हय़ात नगरपालिका नाहीत. ठाणे जिल्हा वगळता ३३ जिल्हय़ांतील नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. ज्या जिल्हय़ांत चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हय़ांत संपूर्ण आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. चारपेक्षा कमी नगरपालिकांच्या निवडणुका असणाऱ्या जिल्हय़ांत फक्त त्या-त्या पालिकांच्या क्षेत्रातच आचारसंहिता लागू राहील. त्यानुसार पालघर, धुळे, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, गडचिरोली व गोंदिया हे सात जिल्हे वगळता २६ जिल्हय़ांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात लोकप्रतिनिधींना त्यांचा विकास निधी खर्च करण्यास मनाई करण्यात आली आहे,  मतदारांवर प्रभाव पडेल अशा कोणत्याही नवीन घोषणा वा निर्णय जाहीर करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खास पथके स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात पोलीस अधीक्षक, प्राप्तिकर अधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी, इत्यादी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल,  वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांप्रमाणे पेड न्यूजबाबत सामाजिक माध्यमांवरही  नजर असेल.

२१२नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स. सहारिया यांच्याकडून जाहीर

  1. टप्प्यात २७ नोव्हेंबरला २५ जिल्हय़ांतील १६५ पालिकांसाठी मतदान होणार आहे.
  2. दुसऱ्या टप्प्यात पुणे लातूर जिल्हय़ांतील १४ पालिकांसाठी १४ डिसेंबरला मतदान होईल.
  3. टप्प्याचे १८ डिसेंबरला. औरंगाबाद, नांदेड, भंडारा व गोंदिया जिल्हय़ांतील २२ पालिकांसाठी मतदान घेण्यात येईल.
  4. टप्प्यात ८ जानेवारी २०१७ ला नागपूर व गोंदिया जिल्हय़ांतील ११ पालिका-नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मोतमोजणी होणार आहे, ही माहिती सहारिया यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-10-2016 at 02:49 IST
Next Story
वाहतूक कोंडीचा शाळांना त्रास