|| शैलजा तिवले

मुंबई : मुंबईसह राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता ३८४ नमुने होईपर्यंत वाट न पाहता २०० नमुन्यांसह जनुकीय चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत जनुकीय तपासण्यांची सुविधा उपलब्ध असूनही बाधित प्रवाशांमध्ये वेळेत ओमायक्रॉनचे निदान करता येत नसल्याने या सुविधेच्या उपयोजितेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करोना विषाणूच्या स्वरूपात काही बदल झाल्यास किंवा उत्परिवर्तन झाल्यास वेळेत निदान करण्याच्या दृष्टीने पालिकेने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत ४ ऑगस्ट रोजी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्र्वेंन्सग) प्रयोगशाळा कार्यान्वित केली. संस्थांकडून अर्थसाहाय्य मिळवून पालिकेने दहा कोटी रुपयांची यंत्रे खरेदी केली. प्रयोगशाळेमध्ये जनुकीय तपासणीची दोन यंत्रे उपलब्ध असून एका वेळी ३८४ नमुन्यांची चाचणी करण्याची सुविधा आहे.

जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असताना मुंबईत दाखल झालेल्या बाधित आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या जनुकीय चाचण्या तातडीने करणे आवश्यक होते, परंतु कस्तुरबा प्रयोगशाळेतील यंत्रामध्ये एका वेळी ३८४ नमुने देणे आवश्यक असल्याने तेवढे नमुने गोळा होईपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या चाचण्या उशिराने होत आहेत. परिणामी त्याचे निदानही वेळेत होण्यात अडचण येत आहे. या चाचण्या महाग असल्यामुळे एका वेळी कमी नमुन्यांसह चाचण्या केल्यास अधिक खर्चीक असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांचे नमुने जनुकीय चाचणीच्या प्रतीक्षेत

पहिल्या टप्प्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असले तरी गेल्या आठवडाभरात मुंबईत जोखमीच्या देशातून आलेले १९ प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील सहा जण असे २५ जण बाधित असल्याचे आढळले आहे. यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले असले तरी पहिल्याच टप्प्यातील चाचण्या उशिरा झाल्याने आणि आवश्यक तेवढे नमुने उपलब्ध नसल्यामुळे या नमुन्यांची प्रत्यक्ष जनुकीय चाचणी अजून झालेली नाही.  

चाचण्या वेळेत करण्यासाठी एनआयव्हीला नमुने

कस्तुरबा प्रयोगशाळेत जनुकीय तपासणीसाठी पुरेसे नमुने नसल्यामुळे मुंबईतील बाधित प्रवाशांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा असूनही पालिकेला पुण्यातील प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. एनआयव्हीमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये मुंबईत आत्तापर्यंत दोन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे  आढळले आहे.

पहिल्या टप्प्यातील जनुकीय चाचणीचे अहवाल प्राप्त

बाधित प्रवाशांच्या पहिल्या टप्प्यातील जनुकीय तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असून यात डोंबिवलीत रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा असल्याचे समजले आहे. हे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविले असून त्यांच्याशी चर्चा करूनच जाहीर केले जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.