मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या प्रारुपात अनेक चुका असल्याचा विरोधकांचा आक्षेप तसेच मुंबईत ११ लाख नावे दुबार असल्याची मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या कबुलीनंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयाद्या जाहीर करण्यास १० दिवसांची तर हरकती व सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार याद्या आता २२ डिसेंबरला जाहीर केल्या जातील.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. १ जुलै२०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांचे प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय विभाजन करुन त्यानुसार अंतिम यादी तयार करण्याची जबाबदारी सबंधित महापालिका आयुक्तांवर निवडणूक आयोगाने सोपविली आहे. त्यानुसार पालिकांनी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

या सदोष याद्यांवर विरोधककांबरोबरच सत्ताधारी भाजपनेही जोरदार आक्षेप घेतले आहेत. मतदारयाद्यांवरील हरकतींसाठी मुदत १५ दिवसांनी वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. शिवसेना ठाकरे तसेच मनसेनेही अंतिम यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ देण्याची मागण केली होती. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही मतदार याद्यांमध्ये घोळ असून त्यात दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली होती.

मुंबईत ११ लाख नावे दुबार असल्याची कबुलीच मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले आहेत. विशेषत: विरोधकांच्या मतदारसंघातील प्रभागांमध्ये हे फेरफार करण्यात आले असून एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांत हलविण्यात आली आहेत. एका पत्त्यावर ३५ लोकांची नावे मतदारयादीत असून असे २६ हजार ३१९ पत्ते असून या पत्त्यांवर ८ लाखांहून अधिक मतदार आहेत. त्याचप्रमाणे ८ लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचा दावा करीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रारूप यादीवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठीची मुदत वाढविण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती.

मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई या महनगरपालिकांमध्येही मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

आधीच्या वेळापत्रकानुसार हरकती व सूचनांसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतही कमी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

नवीन वेळापत्रक :

प्रारुप मतदारयादीवर हरकती व सूचना : ३ डिसेंबर

हरकतींवर प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करणे : १० डिसेंबर

मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर

मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करणे : २२ डिसेंबर