मुंबई :  महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुंबई भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.  निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित  बैठकीला मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर हे उपस्थित असताना पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात भातखळकर यांच्या नावाचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. भातखळकर यांचे मुंबई भाजप अध्यक्ष लोढा यांच्याबरोबरच खासदार -आमदार व अन्य नेत्यांशी फारसे पटत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली आंदोलने, बैठका यातून ही नाराजी व धुसफूस दिसू लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई ही सत्तेसाठी किंवा आपला महापौर बसवण्यासाठी नसून मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे प्रतिपादन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केले. मुंबई भाजपची कार्यकारिणी बैठक दादरमधील वसंत स्मृती मुंबई भाजप कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीस मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी,  अमित साटम,  संजय उपाध्याय, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, काही आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात ही सारी नावे देण्यात आली असली तरी प्रभारी भातखळकर यांचेच नाव नसल्याने ही नजरचूक की मुद्दामहून घडवून आणले याची पक्षात चर्चा सुरू झाली.