मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणल्यानंतर बुधवारी मुंबई महापालिकेने भाजप नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली.

केवळ कंबोज यांचे निवासस्थानच नव्हे तर इमारतीच्या अन्य भागातही अनधिकृत बांधकाम आणि अंतर्गत बदल केल्याचे आढळल्यामुळे पालिकेने सोसायटी, अध्यक्ष, सरचिटणीस, विकासक आदींना नोटीस बजावली आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी पालिकेने सात दिवसांची मुदत दिली आहे. सांताक्रूझ (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडवरील १२ मजली खुशी बेलमोन्डो इमारतीत मोहित कंबोज वास्तव्यास आहेत. इमारतीमधील ९ ते १२ मजल्यांवर कंबोज यांचे निवासस्थान आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयातील पथकाने कंबोज यांच्या निवासस्थानासह खुशी बेलमोन्डो इमारतीची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान कंबोज यांच्या निवासस्थानासह इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. पथकाचा पाहणी अहवाल आणि पालिकेत सादर कागदपक्षांची पडताळणी करून एच-पश्चिम विभाग कार्यालयाने बुधवारी खुशी बेलमोन्डो सोसायटी, अध्यक्ष, सरचिटणीस तसेच अक्षा कंबोज आणि विकासक हिरल क्लासिक प्रॉपर्टीज प्रा. लि. यांना नोटीस बजावली. या इमारतीच्या वाहनतळामध्ये कार्यालयासाठी खोली बांधण्यात आली आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. तसेच सदनिका क्रमांक ०१ मधील अंतर्गत बदल आणि अनधिकृत बांधकामप्रकरणी मयूर कोठारी यांनाही पालिकेने नोटीस बजावली आहे.