मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना, विलेपार्ले येथील मिलन सबवे जवळ मुंबई महापालिका अधिकाऱ्याला आणि एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
निवडणूक आयोगांतर्गत नियुक्त केलेले सर्वेक्षण पथकाचे अधिकारी, कर्मचारी आचारसंहितेच्या काळात वाहनांची तपासणी करतात. शनिवारी रात्री १.२५ वाजता विलेपार्ले येथील मिलन सबवे जवळ निवडणूक कर्तव्य बजावताना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका प्रवाशाने अडथळा निर्माण केला. एका अॅप आधारित वाहनाची तपासणी करताना आणि त्या प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. यावेळी त्या वाहनातील प्रवाशाने अधिकारी आणि कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली.
प्रवाशाने व्हिडिओ रेकॉर्डिंगला आक्षेप घेतला. जेव्हा अधिकाऱ्यांनी रेकॉर्डिंगचा उद्देश समजावून सांगून देखील प्रवाशाने वाहनाच्या आतून कॅमेरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. तसेच वाहनातून उतरून आरडाओरडा करून, कर्मचाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात के-पूर्व वॉर्ड (अंधेरी पूर्व) येथील सर्वेक्षण पथकात नियुक्त असलेले पालिका अधिकारी सुरेश राठोड यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी विलेपार्ले येथील रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला.
