गर्भवती मातेकडून दोन वर्षीय चिमुकलीची हत्या!; दोन दिवसांनी घटना उघड

याप्रकरणी आरोपी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार मध्ये एका गर्भवती महिलेकडून दोन वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी ही घटना घडली होती. सोमवारी शवविच्छेदन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार पुर्वेच्या फुलपाडा येथील पारिजात अपार्टमेंट या इमारतीमध्ये सोनुकूमार सोनी (३२) हा रिक्षाचालक पत्नी नेहा (२२) हिच्या सोबत राहतो. त्यांना नानसी (२) आणि १ वर्षीची अशा दोन मुली आहेत. तर, नेहा ही सात महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी संध्याकाळी नानसी घरात खेळताना पडून बेशुध्द पडल्याचे नेहाने सांगितले. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. नानसीवर विरारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना कळवले. रात्री विरार पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

सोमवारी नानसीच्या शवविच्छेदानाचा अहवाला आला. त्यात डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी यामृत्यूप्रकऱणी नेहाकडे कसून चौकशी केली. त्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात काम करत असताना नेहाने नानसीला जोरात मारले होते. त्यात नानसी न्हाणीघराच्या दरवाज्यावर आपटली आणि खाली पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी आम्ही नेहा सोनीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Murder of a little girl by a pregnant mother msr