मुंबई: मालवणी येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या खुनाप्रकरणी मालवणी पोलिसांनी मुलीच्या आईला आणि तिच्या प्रियाकराला अटक केली आहे. त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच बालिकेची खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यापूर्वी महिलेसमोरच तिच्या प्रियकाराने तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
आऱोपी महिला ३० वर्षांची असून मालवणी येथे राहते. तीन वर्षांपूर्वी ती गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेला होता. त्यादरम्यान तिने एका मुलीला जन्म दिला. तिची मुलगी सध्या अडीच वर्षांची आहे. या काळात या महिलेचे त्याच परिसरात राहणार्या १९ वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांच्या संबंधात बालिका अडथळा ठरू लागली होती. त्यामुळे तिला संपविण्याचा निर्णय दोघांनी घेतला, असे मालवणी पोलिसांनी सांगितले.
शनिवारी रात्री महिलेचा प्रियकर तिच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केला. त्यासाठी बालिकेच्या आईनेही संमती दिली आणि तिच्या समोरच हा घृणास्पद प्रकार घडला. त्यावेळी जखमी झालेल्या बालिकेला जनकल्याण नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे मुलीला आजार असल्याची थाप मुलीच्या आईने मारली. मात्र मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. मालवणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर बलात्कार तसेच पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.