मुंबई : गेल्या साठ वर्षांच्या कालखंडात हिंदी चित्रपट गीतांनी अनेकांच्या मनावर गारूड केले आहे. जीवनातील प्रत्येक भाव अभिव्यक्त करणारी गीते हिंदी चित्रपटांमधून ऐकायला मिळतात, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आजही या काळातील गाण्यांचा ‘नॉस्टॉल्जीया’ अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. यातील अनेक गाणी नेहमीच रसिकांच्या ओठांवर असतात. चित्रपट गीतांची ही परंपरा आजच्या काळातील चित्रपटांमध्ये कायम राखण्यात आली आहे. काळाबरोबर संगीत, गीते त्यांचा बाज थोडा बदलला असला तरी चित्रपटांपासून गाण्यांना व गाण्यांपासून जीवनानुभवाला वेगळे करता येणार नाही. अशाच लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा ‘सूरमयी शाम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’ व ‘हृदयेश’ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ एप्रिलला मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी कविता कृष्णमूर्ती, हिमेश रेशमिया, मोहित चौहान, अंकित तिवारी, वैशाली माडे, अरमान मलिक, तुलसी कुमार, साधना सरगम, ॠषीकेश रानडे, बेला शेंडे व फाल्गुनी पाठक हे गायक-गायिका गायन करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड यांनी केले आहे तर संयोजन साहाय्य विनीत गोरे यांनी केले आहे. मराठी-हिंदी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आवाजाने स्वत:चे स्थान निर्माण केलेल्या गायकांकडून हिंदूी गीतांचा नजराणा खास रसिकांसाठी सादर केला जाणार आहे. तसेच कथक नृत्यांगणा डॉ. टीना तांबे यांचे नृत्य सादरीकरणही या वेळी होणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘सूरमयी शाम’ अनुभवण्याची संधी हिंदूी चित्रपटगीतांच्या दर्दी रसिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार वितरणही सोहळाही याच ठिकाणी होणार आहे.
कधी- शनिवार, २३ एप्रिल, सायंकाळी ६.१५ वा.
कुठे- पार्ले टिळक विद्यालय प्रांगण, विलेपार्ले पूर्व.
बेगम परवीन सुलताना यांची ‘ट्रॅडिशन’ मैफिल
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अनेकांना आकर्षण आहे. बेगम परवीन सुलताना हे नाव तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महत्त्वाचे नाव. परवीन सुलताना यांनी आसामीच नव्हे तर देशभरातील हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील गायकी आपल्या अजोड गायनाने समृद्ध केली आहे. ख्याल, ठुमरी व भजनगायनावर सुलताना यांचे विशेष प्रभुत्व आहे. ‘संगीत नाटक अकादमी सन्माना’बरोबरच ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा ज्येष्ठ गायिकेच्या गायनाची मैफिल ऐकण्याची संधी मुंबईकरांना प्राप्त झाली आहे. ‘ट्रॅडिशन’ या नावाने शुक्रवारी, २२ एप्रिलला ही बेगम परवीन सुलताना यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रख्यात संतूरवादक सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तर श्रीनिवास आचार्य हार्मोनियमवर तर ओजस आडिया हे तबल्यावर बेगमना साथ देणार आहेत. त्यामुळे शुक्रवारची सायंकाळ सुलताना यांच्या स्वरांनी रसिकांवर गारूड करणारी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : २४९६४६८०.
कधी- शुक्रवार, २२ एप्रिल, सायंकाळी ७ वा.
कुठे- नेहरू केंद्र, वरळी.




वाचन संस्कृतीवर रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान
साहित्य अकादमी ही भारतीय साहित्याच्या प्रसारासाठी कार्यरत असणारी मध्यवर्ती संस्था आहे. देशभरात मोजक्या ठिकाणी अकादमीची कार्यालये आहेत. त्यातील एक कार्यालय मुंबईमध्ये आहे. साहित्याचा प्रसार करण्यासाठी अकादमी आपल्या कार्यालयांच्या क्षेत्रांत विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. मुंबईमधील कार्यालयाकडून साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर होत असते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी अकादमीकडून ‘जागतिक पुस्तक दिना’चे औचित्य साधत वाचनसंस्कृतीचा ऊहापोह करणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांचे ‘समकालीन वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पठारे हे ऐंशीच्या दशकानंतरचे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहे. कथा, कादंबरी तसेच चिंतनशील वैचारिक लेखन करण्यासाठी पठारे सर्वाना परिचित आहेत. ‘टोकदार सावलीचे वर्तमान’, ‘ताम्रपट’, ‘नामुष्कीचे स्वगत’, ‘भरचौकातील अरण्यरुदन’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना आकर्षित केले आहे. चिंतनशील ललित लेखक म्हणून पठारे सर्वाना परिचित असले तरी त्यांनी प्रदीर्घ काळ भौतिकशास्त्राचे अध्यापन केले असल्याचे फार कमी जणांना ठाऊक असेल. त्यामुळे मराठी तसेच इतर भाषांमधील भारतीय साहित्यापासून ते वैश्विक साहित्यापर्यंतचे त्यांचे वाचनही अफाट असल्याचे त्यांच्या वैचारिक लेखांच्या पुस्तकांतून तसेच ‘प्रत्यय आणि व्यत्यय’ या दिलीप चित्रे यांच्याबरोबरच्या दीर्घ मुलाखतीच्या पुस्तकातून वाचकांच्या प्रत्ययास आले आहे. त्यामुळे समकालीन वाचनसंस्कृतीबाबत पाठारे यांच्यासारख्या लिहित्या व वाचत्या लेखकाची निरीक्षणे, त्यांची मते, निष्कर्ष तसेच सल्ले नवोदितांना नक्कीच फायद्याचे ठरतील. त्यामुळे पुस्तक दिनाच्या निमित्ताने अकादमीने आयोजित केलेल्या व्याख्यानातून वाचनमंथन अनुभवण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
कधी- शनिवार, २३ एप्रिल, सायंकाळी ६ वा.
कुठे- साहित्य अकादमी सभागृह, १७२, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, दादर (पूर्व).
कुमार गंधर्वाच्या बंदिशी
कुमार गंधर्व हे नाव शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी आस्थेचा विषय आहे. कुमारजींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विविध घराण्यांच्या पारंपरिक भिंतींना भेदून स्वत:ची अशी आगळ्या ढंगाची गायकी घडवली. प्रचंड सृजनशीलता व प्रतिभा असलेल्या कुमारजींनी आपल्या गायकीने कालातीततेचा प्रत्यय दिलेला आहे. कुमारजींनी गायलेल्या निर्गुणी भजने, लोकसंगीत, नाटय़संगीताची मोहिनी दर्दी संगीत रसिकांवर कायमची पडलेली आहे. त्यांच्या गायकीत शब्द व अर्थाला असणारे महत्त्व हे त्यांना इतर गायकांपेक्षा पृथगात्म करते. गातानाच्या त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा या शब्दांना व अर्थाना मूर्त रूप देणाऱ्या असत. त्यांनी बंदिश गायला सुरुवात केली की त्यांचा श्रोत्यांशी असणारा संवाद आकार घेऊ लागायचा. अशा कुमारजींच्या दुर्मीळ बंदिशी ऐकायला मिळाल्यास कोणाही सच्च्या ‘कानसेना’स आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु, अशी संधी मुंबईकरांना मिळणार आहे ती, कर्नाटक संघाने रविवारी आयोजित केलेल्या ‘कुमार गंधर्व चिंतन’ या कार्यक्रमात. यात आसावरी करंबेकर, डॉ. श्रीकांत ढोकरीकर, पं. राजाभाऊ काळे आणि मेघनाथ कोल्हापुरे हे कलाकार कुमारजींच्या दुर्मीळ बंदिशी सादर करणार आहेत. या वेळी अरुण रहाळकर हे तबल्यावर तर बी. जी. घाटे हे हार्मोनियमवर साथ देतील.
कधी- रविवार, २४ एप्रिल, सकाळी १० वा.
कुठे- कर्नाटक संघ सभागृह, माहीम.
‘मयूर’चे नृत्य कथन
शास्त्रीय संगीताबरोबरच शास्त्रीय नृत्याचीही समृद्ध परंपरा भारतामध्ये आहे. यातील कथक नृत्य तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कथक नृत्यामध्ये नृत्य माध्यमाच्या साहाय्याने कथेचे कथन केले जात असते. उत्तर भारतात उगम पावलेल्या कथकला तिथल्या भक्ती चळवळीचा व्यापक संदर्भ आहे. कथक नृत्य परंपरेत काही घराणी त्यांच्या नृत्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. यातील बनारस घराण्याने कथक नृत्यामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बनारसची संस्कृतीच या घराण्याच्या नृत्यामधून अभिव्यक्त होत असते. अशा विलोभनीय नृत्याचा आविष्कार पाहण्याची संधी येत्या रविवारी एनसीपीएच्या सभागृहात मिळणार आहे. विशाल कृष्णा या बनारस घराण्याच्या अकराव्या पिढीची धुरा सांभाळणाऱ्या नृत्यकाराचे नृत्य सादरीकरण येथे होणार आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी आजी सितारा देवी यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवल्यानंतर रविशंकर मिश्रा यांच्याकडूनही कथक शिकलेल्या विशाल कृष्णा यांच्या ‘नर्तन प्रिया’ या नृत्य कार्यक्रमात ‘मयूर’विषयीच्या कथांचे कथन केले जाणार आहे. मयूर हा मोर असून तो कार्तिकेय व कृष्ण यांचे वाहन होते. भारतीय पुराणकथा व त्यांचा जनमानसावर खोल प्रभाव यांना नृत्याच्या माध्यमातून साकार झाल्याचे पाहण्याची पर्वणीच ‘नर्तन प्रिया’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आठवडय़ाच्या शेवटच्या सायंकाळी रसिकांना मिळणार आहे.
कधी- रविवार, २४ एप्रिल, सायंकाळी ७ वा.
कुठे- एक्सपेरिमेंटल थिएटर, नरिमन पॉइंट.
कलेचं स्पंदन
पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई आणि एन्हान्स ग्रुप गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पंदन’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कलाप्रदर्शन मुंबईत मांडण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गोवा तसंच देशाच्या इतर भागांतले आणि विदेशातील ७५ च्यावर नामवंत तसंच प्रथितयश कलाकारांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. अनेक समकालीन कलाकारांची कला या ठिकाणी विविध माध्यमांद्वारे प्रदर्शित केली जाईल. सदर प्रदर्शनात अभिनेत्री, कलाकार रश्मी पित्रे, अमिता गोस्वामी, अरविंद वायदनकर, भगवती नाथ, इरा टाक, गुलशन आचारी, नीता देसाई, पी कश्यप आदी प्रथितयश कलाकार भाग घेणार आहेत.
कुठे : पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी. कधी : २१ ते ३० एप्रिल.
सकाळी ११ ते सायंकाळी ७
अॅबस्ट्रॅक्ट छायाचित्रणाचा वन-मॅन ‘ग्रुप’ शो
न्यूयॉर्क, दिल्ली आणि मुंबईमधल्या महत्त्वपूर्ण गॅलरीज आणि स्थलांतर अशोक रॉय यांचे फोटो जीनियस पेंटिंग अभियान मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत आहे. नवीनतम आणि एका आगळ्यावेगळ्या कलाकृतीला प्रोत्साहन देत असताना रॉय यांच्या अपरिमित प्रयत्नांसाठी त्यांनी कलाकारांच्या वर्तमान पिढीचे लक्ष वेधून घेतले आहे . ‘फोटो जीनियस आर्ट’ चे वर्णन अॅबस्ट्रॅक्ट फोटोग्राफीला पेंटिंगनी दिलेली मानवंदना, असे करता येईल. इथे कलाकार स्वत:च्या एका अॅबस्ट्रॅक्ट फोटोपासून सुरुवात करतात आणि त्याला कॅन्व्हॉसवर स्थानांतरित करतात, ऑइल पेंटमध्ये आपल्या ब्रशच्या फटकारांनी मूळ पेंटिंग मिळवण्याच्या दृष्टीने कलाकृती साकारली जाते आणि ती पारंपरिक कोऱ्या कॅन्व्हासने सुरू केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अतिशय उत्साहवर्धक वाटते.
कधी : १९ ते २५ एप्रिल
कुठे : नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी.
लिरिकल स्माइल
चित्रकार श्यामल मुखर्जी यांनी अलीकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘लिरिकल स्माइल’ हे एकल चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. चित्रकार श्यामल मुखर्जी यांच्या कुंचल्यातून साकार होणारी रंगीन रंगछटांनी युक्त अशी लोक दृश्य आणि जीवन चित्रण असलेली चित्रं त्यांच्या मूळ राज्यात एक कौतुकाचा विषय आहे. के. जी. सुब्रमण्यम यांनी काचेवर विकसित केलेलं ‘रिव्हर्स पेंटिंग’ हे दुर्मीळ तंत्र त्यांनी आत्मसात केलं आहे. त्यांच्या चित्रांमधलं प्रत्येक व्यक्तिचित्रं हे वेगळं आणि स्वत:ची कहाणी सांगणारं आहे. ही व्यक्तिमत्त्व काही तरी काम करताना किंवा सादरीकरण करताना दिसतात. भगवा, लाल आणि हिरवा रंग वापरून या व्यक्तींचे पोशाख रंगवले आहेत. कधी : १९ ते २५ एप्रिल
कुठे : जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा.
संकलन : प्रसाद हाळवे