मुंबई : सोने तारण ठेवून कर्जवाटप करणार्‍या ‘मुथुट’,‘मणप्पुरम‘ या बँकेतर वित्तीय कंपन्यांकडून मुद्रांक चोरी केली जात असल्याच्या आरोपाप्रकरणी अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी तपासणी सुरू केली आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही या कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा स्मरण पत्र पाठविण्यात आले आहे. पुणे मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी मुद्रांक बुडविल्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार, सोने तारण करारनाम्याची नोंदणी बंधनकारक नसली तरी त्यावर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित करारनामा अधिकृत होतो. बँकांकडून कर्ज देताना अशा रीतीने तारण करार बनवला जातो आणि मुद्रांक शुल्क अदा केले जाते. मात्र सोने तारण ठेवून कर्ज वाटप करणार्‍या मुथुट, मणप्पुरम आदी कंपन्यांकडून तशी खबरदारी घेतली जात नसल्याची बाब पुण्यातील एक रहिवाशी सुदेश राय यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सोने तारण ठेवून कर्ज घेणार्‍या व्यक्तीलाही भविष्यात अवैध करारनाम्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. राय यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र ती फेटाळण्यात आली असली तरी संबंधित राज्यातील नोंदणी व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात रीतसर तक्रार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राय यांनी मुथुट, मणप्पुरम या वित्तीय संस्थांकडून होत असलेल्या मुद्रांक चोरीबाबत मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली.

एका प्रकरणात मुद्रांक चोरी झाल्याचे पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी मान्यही केले. संबंधित कंपन्यांना दंड भरण्याची नोटिस जारी केली. या पार्श्वभूमीवर अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी जयराम पवार यांनी मुथुट आणि मणप्पुरम या दोन कंपन्याच्या मुख्यालयाला पत्र पाठविले आहे. स्थानिक कार्यालयाकडून दिलेली माहिती अपुरी असून याबाबत सविस्तर माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले आहे. तब्बल ११ महिन्यांनंतरही ही माहिती दिलेली नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.

मुथुट आणि मणप्पुरम या वित्तीय कंपन्यांच्या स्थानिक कार्यालयांनी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. याशिवाय आणखी माहिती हवी असून त्याबाबत मुख्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. मुद्रांक चोरी आहे किंवा नाही, हे तपासणी केल्यानंतरच आढळून येईल – जयराम पवार, मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी.

‘शुल्क शासनाकडे जमा नाही’

‘मुथुट’कडे तारण म्हणून ग्राहकांचे सुमारे २०५ ते २०८ किलो सोने तर ‘मणप्पुरम’कडे ६० ते ६५ किलो सोने जमा आहे. या सर्व तारण करारनाम्यावर ग्राहकांकडून मुद्रांक शुल्क आकारण्यात आले आहेत. मात्र ते शासनाकडे जमा केलेले नाही, असा राय यांचा आरोप आहे. याबाबत मुथुट तसेच मणप्पुरम या वित्तीय कंपन्यांशी ईमेलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र राज्याच्या मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांशी केलेल्या पत्रव्यवहारात या दोन्ही कंपन्यांनी, सुवर्ण कर्ज तारण करारनाम्यावर मुद्रांक शुल्क लागू होत नाही, अशी भूमिका मांडली आहे.