लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन १६ कोटी रुपयांचे शेअर्स स्वतःच्या खात्यात वळते करून त्याची विक्री केल्याप्रकरणी दहिसर येथील एमएचबी पोलिसांनी गुजरातमधील एका महिलेसह तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर केला असून याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
वनिता गांधी व सुधा गांधी यांच्या नावावर २०१७ मध्ये बाळकृष्ण इंजस्ट्रीजचे ५४ हजार शेअर्स होते. गुजरातमधील वडोदरा येथील वनिता गांधी या महिलेच्या डिमॅट खात्यावर हे शेअर्स वळते करण्यात आले. त्यानंतर त्यांची १६ कोटी २० लाख रुपयांना विक्री करण्यात आली. याप्रकरणी वनिता गांधी यांच्यावतीने त्यांचे सल्लागार वैभव जोशी यांनी तक्रार केली असून एमएचबी पोलीस ठाण्यात तोयगारिकी करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-तोतया अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले, खार पोलिसांकडून पाच जणांना अटक
गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या तोतया महिलेसह शेअर्स खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीसह दोन कंपन्यांतील अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. बनावट कागदपत्रांच्या साह्याने केवायसी करून सर्व शेअर्स डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर त्यांची विक्री करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.