mva announces to contest kasba peth and chinchwad bypolls congress claims kasba constituency zws 70 | Loksatta

पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे सहा इच्छुक उमेदवार आहेत.

mva announces to contest kasba peth and chinchwad

मुंबई : विधानसभेच्या कसबा व पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उतरण्याच्या तयारीत आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्या शुक्रवारी होणार आहे. आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस कसबा मतदारसंघावर दावा करणार असल्याचे सूतोवाच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

पिंपरी-चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून सहा उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून आघाडीच्या उद्याच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दादर येथील टिळक भवनात गुरुवारी प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. बैठकीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांबद्दल बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे सहा इच्छुक उमेदवार आहेत. मान्यतेसाठी त्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जातील. पक्षश्रेष्ठी त्यावर अंतिम निर्णय घेतील.

‘पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील’

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली. कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने विरोधकांना पत्र दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.

शैलेश टिळक, अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी ?

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली असतानाच संभाव्य उमेदवार असलेले शैलेश टिळक यांनी कसबा विधानसभेसाठी, तर अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज नेले. या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नसतानाही अर्ज नेण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान

होणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची सात फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. कसबा आणि चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षामधील अनेक इच्छुक आहेत.

‘कसब्या’साठी राष्ट्रवादीचे प्रयत्न

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस गंभीर नाही. गेल्या चार निवडणुकात काँग्रेसला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीला अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.  कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडलेली भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढे मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणुकीबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 04:44 IST
Next Story
मुंबई महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प; ५०,००० कोटींवर आकारमान?