मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बोलावलेल्या बैठकीत ६० पैकी केवळ ३७ आमदार उपस्थित राहिल्याने चर्चांना पेव फुटले आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हीच खंत बोलून दाखवत महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? असा सवाल उपस्थित केला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस शपचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विधिमंडळात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर संयुक्त भूमिका घेणे तसेच सर्व घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. अलीकडील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर ‘जे गेले त्यांचा विचार करू नका, पुढील लढाईवर लक्ष केंद्रित करा, असा संदेशही नेतृत्वाने दिल्याचे समजते. मात्र या बैठकीत जवळपास निम्मे खासदार अनुपस्थित राहिल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले.

महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील समन्वयाबाबत स्पष्टपणे चिंता व्यक्त केल्याची माहिती आहे. “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभागृहात विरोधी पक्ष म्हणून एकत्रित भूमिका मांडली जाते का, एकाच मुद्द्यावर आक्रमकपणे लढले जाते का, याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आगामी विधिमंडळ अधिवेशनात तसेच राज्यभरातील सभा, आंदोलने आणि जनसंपर्क कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधकांची एकी केवळ बैठकींपुरती न राहता जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, असा संदेश त्यांनी बैठकीत दिल्याचे समजते. शिवसेनेतील सहा खासदारांच्या अलीकडील फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या वक्तव्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते अनुपस्थित

बैठकीला गैरहजर असणाऱ्या आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर, जयंत पाटील या बड्या नेत्यांचा समावेश आहे. जयंत पाटील हे वैयक्तिक कारणासाठी उपस्थित न राहिल्याचे समजले मात्र अन्य आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.