मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवण्याच्या मागणीसाठी ‘महाविकास आघाडी’च्या वतीने शनिवारी ‘फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान’ या मार्गावर काढण्यात आलेल्या ‘सत्याच्या मोर्चा’कडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसले. ‘मविआ’चे बहुतांश घटक पक्ष मोर्चात सामील असताना काँग्रेसचा कार्यकर्ता, झेंडा, फलक मोर्चात नावालासुद्धा दिसला नाही. व्यासपीठावर मात्र सहा काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.
सकाळी १२ वाजल्यापासून फॅशन स्ट्रीटवर मोर्चासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. लोकल, मेट्रोनी आपल्यानेत्यांच्या घोषणा देत कार्यकर्ते जथ्यांनी फॅशन स्ट्रीटवर येत होते. मोर्चा मार्गावरती शेकडो शुभेच्छा फलक व हजारो झेंड्यांची गर्दी होती. दुपारी दिड वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, माकप, भाकप, शेकाप व सकप या पक्षांचे झेंडे मोर्चात ठळकपणे दिसत होते. ‘मविआ’चा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचा मोर्चावर बहिष्कार होता. ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘नही ‘चलेगी नही चलेगी वोट चोरी नही चलेगी’, ‘लेके रहेंगे…. आझादी’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
‘सत्तेचा नाही, सत्याचा मोर्चा’, ‘वोट नाही खोट’ असे फलक मोर्चात सर्वत्र होते. वृद्ध, युवक पुरुष व महिला असे सर्व स्तरातील कार्यकर्ते मोर्चात सामील होते. ‘फॅशन स्ट्रीट’वरची दुकाने आज बंद ठेवली होती. ‘मेट्रो सिनेमा’पासून मोर्चाला प्रारंभ झाला. महापालिका मार्गावरुन मोर्चा आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या सभास्थळी सोडी तीन वाजता पोचला. मोर्चामध्ये मुख्य नेते सहभागी नव्हते. ते व्यासपीठावर थेट आले. मोर्चा मार्गावर तीन ‘व्हॅनीटी’ तैनात होत्या. वाढलेल्या उकाड्याने मोर्चेकऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता. पाणी बाटल्या आणि ऊस रसासाठी कार्यकर्ते धडपडत होते. मोर्चा मार्गावर पोलीस आणि पालिकेने व्यवस्था चोख ठेवली होती.
मोर्चाच्या सभेचे व्यासपीठ मुंबई काँग्रेस कार्यालयाला खेटून होते. मात्र काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोर्चाला अनुपस्थिती होती. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अरिफ नसीम खान, सतेज पाटील, भाई जगताप आणि सचिन सावंत या काँग्रेस नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मोर्चाला मार्गदर्शन करणारा एक नेता नव्हता. त्यामुळे मोर्चा पूर्णपणे विस्कळीत झाला. विविध पक्षाचे कार्यकर्ते आपल्याआपल्या पद्धतीने मतदार याद्यांबाबत रोष प्रकट करत होते.
शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश दिसला. मोर्चा मार्गावरचे सगळे वातावरण भगवे झाले हाेते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा भरणा लक्षवेधी होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजीमध्ये मनसेचे कार्यकर्ते आघाडीवर होते.
काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष गायब
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती जाणवली. सपकाळ यांनी सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याचे टाळले होते. यामुळेच बहुधा भाषणात राज ठाकरे यांनी सर्व पक्षांचा उल्लेख केला पण काँग्रेसचे नावच घेतले नाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला टीका करण्याची संधी मिळू नये म्हणून सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याचे टाळल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.
