मुंबई: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत १७ पैकी नाशिक आणि नांदेड वगळता १५ जागांवर महाविकास आघाडीत सहमती झाली आहे. काँग्रेस सर्वाधिक ८, शिवसेना (ठाकरे) ४ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ३ जागांवर निवडणूक लढणार आहे. नाशिक आणि नांदेड या जागांचा तिढा या बैठकीत सुटला नसला तरी नांदेडच्या जागेवर काँग्रेस तर नाशिकच्या जागेवर शिवसेना (ठाकरे) लढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. . या बैठकीत १५ जागांवर सहमती झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. ही निवडणूक जिंकण्यासाठीची मतांची गोळाबेरीज जुळत नसली तरी लोकशाहीत निवडणूक लढण्याला काँग्रेसकडून प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार बैठकीतही सर्वाधिक जागा काँग्रेसला लढू देण्यात शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार) अधिक ताणण्यात आले नाही. नांदेड आणि नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला असला तरी सर्वाधिक रस्सीखेच ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आहे. नाशिक हा आपला गड असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे तर याआधी नांदेडची जागा काँग्रेसकडे होती त्यामुळे ती जागा सोडण्यास काँग्रेस तयार नाही. नाशिकची जागा याआधी राष्ट्रवादीची असल्याने त्या जागेवर राष्ट्रवादीही आग्रह आहे.

कोणता पक्ष कोणती जागा लढवेल यावर एकमत झाले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. दोन जागांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसांत या राहिलेल्या दोन जागांबाबत देखील अंतिम निर्णय होईल. नांदेड आणि नाशिकच्या जागेबाबत आमच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा वगळता इतर १५ जागांबाबत आम्ही आज निर्णय जाहीर केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्या पक्षाला कोणती जागा?

काँग्रेस : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर (पोटनिवडणूक) शिवसेना (ठाकरे): रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी (शरद पवार ) : पुणे, ठाणे, सातारा-सांगली

आघाडीत परस्परविरोधी मत

महाविकास आघाडीचे जागावाटप होत असताना काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) नेत्यांच्या मतांमध्ये मात्र विसंगती दिसून आले. शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी आमच्याकडे खूपच कमी मतदान आहे. त्यामुळे या जागांमध्ये लक्ष कशाला घालायचे याबाबत आमची चर्चा झाली. काँग्रेसला सर्वाधिक जागा लढवू द्या, त्यांना निवडणूक लढविण्याची खुमखुमी आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. याला उत्तर देताना सपकाळ यांनी संख्याबळ हे आपल्याजागी असल्याचे सांगताना लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. निवडणुका जिंकणे हा वेगळा भाग आहे आणि आपल्या मूल्यांकरिता आणि विचारांकरिता लढणे हा वेगळा भाग आहे. महाविकास आघाडीची संघर्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसने केली निरीक्षकांची नियुक्ती

या निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या असून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी विधान परिषदेतील गटनते सतेज ऊर्फ बंटी पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, मराठवाड्यातील नांदेडसाठी खासदार रविंद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विदर्भातील यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, कोकण विभागातील ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आली आहे.