मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने नुकतीच वसई रोड रेल्वे स्थानकात मोठी कारवाई करून म्हैसूर स्पेशल फेअर एक्स्प्रेसमधून होत असलेल्या तंबाखू, पान मसाला आणि गुटखा उत्पादनांच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे ३ लाख २५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
गाडी क्रमांक ०६२८२ म्हैसूर स्पेशल फेअर एक्स्प्रेसमध्ये पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत वसई रोड येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), वसई रोड येथील रेल्वे पोलीस; तसेच वाणिज्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने एक्स्प्रेसच्या एसएलआरडी डब्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रोहित मिश्रा आणि पंकज साहू हे दोन संशयित मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांनी आठ पिशव्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध ब्रँडचा तंबाखू, पान मसाला आणि गुटखा उत्पादनांची तब्बल १,७७१ पाकिटे आढळली. या संपूर्ण मालाचे अंदाजे बाजारमूल्य ३ लाख २५ हजार ६७८ रुपये इतके आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रोहित मिश्रा आणि पंकज साहू यांच्याकडे कोणतेही वैध प्रवास तिकीट किंवा परवाना नसताना ते रेल्वेतून प्रवास करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर वसई रोड स्थानकावर स्वतंत्र पंच आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्त साहित्याचा पंचनामा करण्यात आला. संपूर्ण मुद्देमाल, आरोपी आणि संबंधित कागदपत्रे पुढील कायदेशीर कारवाईसाठी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षककडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम २२३, २७५ आणि ३(५), अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम ३० (२) (अ), ५८ आणि ५९ तसेच रेल्वे अधिनियम १९८९ अंतर्गत कलम १४७, १५५ आणि १६२ अन्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे परिसरातील बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी भविष्यात अशा संयुक्त मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबईसह राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्यांची
मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. मुंबईसह राज्यातील विविध भागात गुटखा, सुगंधित पान मसाल्याचा गैरव्यवहार सुरू आहे. पान मसाला आणि गुटख्याची आयात रेल्वेमार्गाने होते. हे प्रकार रोखण्यासाठी, संबंधित विभागाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे.
