मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत पात्र आणि करार झालेल्या रहिवाशांनी सात दिवसांत घरे रिकामी करावीत अन्यथा त्यानंतर घर रिकामे करण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. कडक भूमिका घेत निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दिला. तर दुसरीकडे ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने या रहिवाशांना ४८ तासांत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आता कारवाई अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची पात्रता सर्वप्रथम झालेली असतानाही पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. पहिल्या टप्प्यात पाडण्यात येणाऱ्या येथील इमारतीतील रहिवाशांनी घरे रिकामी केलेली नाहीत. त्यामुळे इमारतींचे पाडकाम करता येत नसल्याने मंडळाने काही दिवसांपूर्वी येथील ललित कला भवन मैदानातील मोकळय़ा जागेत कामाला सुरुवात केली. मात्र कामाला गती देण्यासाठी संबंधित इमारतींचे पाडकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळाने या रहिवाशांची घरे रिकामी करण्यासाठी ‘९५ अ’अंतर्गत निष्कासनाची कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार ९५ अ च्या कारवाईची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र यानंतरही अनेक रहिवासी घरे रिकामी करत नसल्याने सोमवारी अखेर मंडळाने शेवटची ४८ तासांची नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. ४८ तासांत घरे रिकामी करणे या नोटिशीनुसार आवश्यक आहे. मात्र गृहनिर्माणमंत्र्यांनी सात दिवसांची मुदत दिल्याने आम्ही ही सात दिवस प्रतीक्षा करू असे म्हसे यांनी सांगितले. सोमवारी रात्री आव्हाड यांनी म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, म्हसे आणि अन्य अधिकाऱ्यांसह ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची भेट घेतली. या वेळी घेण्यात आलेल्या बैठकीत आव्हाड यांनी करार झालेल्या पात्र रहिवाशांना सात दिवसांत घरे रिकामी करा. त्यानंतर मात्र कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर तरी रहिवासी घरे रिकामी करतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.