मुंबई…बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सर्वात आधी ज्या ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी समर्थन देऊन इमारती रिकाम्या केल्या होत्या, त्याच चाळींचा पुनर्विकास संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी होती. परिणामी मागील सात वर्षांपासून रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. मात्र आता ३४२ रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बांधण्यात आलेल्या दोन इमारतींना नुकताच निवासी दाखला मिळाला आहे. त्यामुळे आता या इमारतीतील ३४२ घरांचा ताबा देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याची प्रक्रिया मंडळाने सुरू केली आहे.
वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्यात पुनर्वसित इमारतींचे बांधकाम सुरू असून जशा इमारती पूर्ण होत आहेत तसा इमारतीतील घरांचा ताबा दिला जात आहे. त्यानुसार सर्वात आधी, ऑगस्ट २०२५ मध्ये वरळीतील ५५६ रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आला. त्यानंतर येथील आणखी ८२७ रहिवाशांना ताबा देण्यात आला असून सध्या ५७४ घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी नायगावमधील काही रहिवाशांचेही ५०० चौ. फुटांच्या घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नायगावमधील ८६४ घरांचा ताबा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका कार्यक्रमात मार्च २०२६ मध्ये देण्यात आला.
तर त्यानंतर आणखी ५३७ घरांचा ताबा जून २०२६ मध्ये देण्यात आला. या दोन्ही चाळीतील रहिवाशांना ताबा देण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे मात्र ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना मात्र हक्काच्या घराची प्रतीक्षा होती. महत्त्वाचे म्हणजे या ना.म.जोशी मार्गमधील रहिवाशांनी सर्वात आधी प्रकल्पास समर्थन देत घरे, इमारती रिकाम्या करून दिल्या. मात्र याच चाळीतील रहिवाशांना अद्यापही घराचा ताबा मिळालेला नाही. या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप करून ना.म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने कामास वेग देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई मंडळाने १२४१ घरांचे काम हाती घेतले. सात पुनर्वसित इमारतींमध्ये या घरांचा समावेश आहे. त्यानुसार दोन इमारतींची कामे पूर्ण झाली असून अखेर या इमारतींना म्हाडाकडून निवासी दाखला देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. या दोन इमारतींत ३४२ घरांचा समावेश आहे, तेव्हा या घरांचा ताबा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. दरम्यान ३४२ घरांना निवासी दाखला मिळाल्याने सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात असणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्काच्या घराची वाट पाहत होतो. आता आमची प्रतीक्षा संपणार असून घराचा ताबा मिळणार असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवासी कमलाकर नडगावकर यांनी दिली. तर समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनीही घराचा ताबा मिळणे ही रहिवाशांसाठी आनंदाची बाब असल्याचे म्हणत उर्वरित इमारतींच्या कामाला वेग देत सर्व रहिवाशांना संक्रमण शिबिरातून नव्या घरात स्थलांतरित करावे अशी मागणी केली आहे.
दोन इमारतीतील ३४२ घरांचा ताबा दिल्यानंतर उर्वरित पाच इमारतींचेही काम लवकरच पूर्ण करून या इमारतीतील घरांचा ताबा दीड-दोन महिन्यांत देण्याचे नियोजन मंडळाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे बीडीडी चाळीतील १५००० हून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन अर्थात हा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे नुकतेच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता तिन्ही प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
