राष्ट्रवादीला बळ, शिवसेना चौथ्या क्रमांकावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्याच्या ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला़ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली, तर सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी विदर्भाने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने दोन जिल्हा परिषदा आणि नगपंचायतींच्या निवडणुका लक्षणीय ठरल्या. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याची प्रतिक्रिया समाजात उमटली व त्याचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचा दावा भाजपने केला असला तरी महाविकास आघाडीने हा दावा फेटाळून लावला. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे संख्याबळ एकत्रित केल्यास ते भाजपपेक्षा अधिक आहे, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.    सरकारमधील गोंधळ, ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण, भ्रष्टाचार यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करीत भाजपने प्रचारात वातावरण तापवले होते. सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजपला एकतर्फी यश मिळालेले नाही.  नगरपंचायतींच्या एकूण १६४९ जगांपैकी ३८४ जागा जिंकून भाजपने आपला पहिला क्रमांक कायम राखला. विधानसभा निवडणुकीनंतर सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका व आता नगरपंचायतींमध्ये भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये भाजपने यश मिळविले आहे. छोट्या शहरांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपला मिळालेल्या यशाने आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सूचक इशारा मिळाला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपने राज्यात जम बसविला आणि पक्षाचा पाया अधिक विस्तृत केल्याचे विविध निकालांवरून स्पष्ट होते. 

 भाजपला राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादीने ३४४ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले. विधानसभेपाठोपाठ नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळायचे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकणात यश मिळाले आहे. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आजच्या निकालावरून राष्ट्रवादी हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे सिद्ध झाले, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांनी उद्देशून काढला. सत्तेचा वापर करीत राष्ट्रवादीने पक्षाचा पाया विस्तारला. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. विदर्भातही राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले आहे. आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित यांच्या नेतृत्वाखाली कवठे-महाकांळमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. २३ वर्षीय रोहित पाटील यांना पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम राखले.

 मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली. शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत. यापैकी ८० जागा कोकणातील आहेत.  शिवसेनेने कोकणात वर्चस्व कायम राखले असले तरी सिंधुदुर्गमध्ये राणे आणि शिवसेनेत नेहमीप्रमाणे रस्सीखेच पाहायला मिळाली. शिवसेनेची विदर्भातील घसरगुंडी या वेळीही कायम राहिली. शिवसेनेचे नेतृत्व मुंबई, ठाण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करते तर राज्याच्या अन्य भागांत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविली जाते. मुख्यमंत्री, नगरविकास ही महत्त्वाची पदे शिवसेनेकडे असतानाही छोट्या शहरांमध्ये शिवसेनेला अपेक्षित कौल मिळालेला नाही.

 काँग्रेसची देशभर पीछेहाट होत असताना महाराष्ट्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. राष्ट्रवादीने पुन्हा मागे टाकणे हे काँग्रेससाठी मानहानिकारक असेल़  गटबाजी, नेतृत्वाचा अभाव, प्रदेशाध्यक्षांची बेताल वक्तव्ये याचा काँग्रेसला फटका बसला. विदर्भाने साथ दिली हीच काँग्रेससाठी जमेची बाजू. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रभाव क्षेत्रातच फटका बसला.

सत्तेसाठी धडपड 

१०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले तर उर्वरित नऊमधील निकाल गुरुवारी जाहीर होतील. पूर्ण बहुमत मिळालेल्या पंचायतींमध्ये सत्तेचा खेळ रंगणार नाही. पण, बहुमत नसलेल्या पंचायतींमध्ये सत्ता संपादनासाठी हालचालींना वेग आला. अपक्ष व छोट्या पक्षांच्या सदस्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली. जास्तीत जास्त नगरपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करणे हे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष्य असेल.

या नेत्यांच्या मतदारसंघात पराभव

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (भाजप), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर.

महाविकास आघाडी सरकारने सत्ता, धनशक्तीचा गैरवापर करुनही भाजपने घटक पक्षांबरोबर सर्वाधिक ३० हून अधिक नगरपालिकांमध्ये सत्ता मिळविली आहे़  सर्वाधिक जागांवर विजय मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.  – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल पाहता पुढील बरीच वर्षे भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागणार हे स्पष्ट होते. – संजय राऊत, खासदार, शिवसेना प्रवक्ते

नगरपंचायतींच्या निकालांवरून राज्याच्या जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रम हाती घेतले होते.  त्याचे हे यश आहे़   – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री

नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. कोकणात पक्षाने खाते उघडले. काँग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. जनेतेने भाजपला नाकारले आहे. – नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नगरपंचायतीतील एकूण जागा १६४९

भाजप – ३८४

राष्ट्रवादी – ३४४ 

काँग्रेस – ३१६

शिवसेना – २८४

मनसे – ४

अपक्ष – २०६

स्थानिक आघाड्या – ८२

बसपा – ४

माकप – ११

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar panchayat bjp shiv sena congress national congress party akp
First published on: 20-01-2022 at 01:13 IST