मुंबई : नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मौजे दाभा येथील जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता बुधवारी झालेल्या मंत्रिमडळ बैठकीत देण्यात आली. हे देशातील पहिले कृषी सुविधा केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा एक साठी मूळ २३५ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेत ३४२.७२ कोटी रुपयांची वाढ करून एकूण ५७७.७२ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या टप्पा दोन साठी ३०१.९१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.

नागपूर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील ज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादासाठी एकात्मिक व्यासपीठ विकसित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनातील प्रगती, आधुनिक कृषी पद्धती आणि जागतिक स्तरावरील कृषी विषयक घडामोडींचे आदान- प्रदान करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टप्पा एकच्या मूळ प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान केंद्राच्या प्रभावी संचालनासाठी आवश्यक असलेल्या विविध अनुषंगिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एकात्मिक प्रदर्शन सभागृह, प्रशासकीय कार्यालये, सेवा क्षेत्रे, व्हीआयपी लाउंज, कॅफेटेरिया आणि हॉस्पिटॅलिटी सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर उच्च दर्जाची एचव्हीएसी प्रणाली, एकात्मिक इमारत बांधकाम व्यवस्थापन यंत्रणा, अत्याधुनिक सुरक्षा व निगराणी व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अंतर्गत सजावटीची कामे करण्यात येणार आहेत.

प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत ३०१.९१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात २ हजार ५०० आसन क्षमतेचे भव्य सभागृह, कॉन्फरन्स हॉल, सेमिनार हॉल्स, व्हीआयपी कक्ष आणि इतर पूरक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. या सुविधा केंद्राच्या संचालनासाठी व्यावसायिक आराखडा तयार करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या स्तरावर नियामक समिती स्थापन करण्यास तसेच या केंद्राच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांना कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.