मुंबई : नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील परिषदा, प्रदर्शन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे नागपूरच्या अर्थव्यवस्थेला, पर्यटनाला, उद्योगांना आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो उपस्थित होते.
नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या आराखड्याशी सुसंगत पद्धतीने हे केंद्र उभारले जाणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे या तिन्ही वाहतूक सुविधांचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, प्रदर्शन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करता येईल. नागपूरचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून या प्रकल्पाची ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
केंद्राची वास्तुरचना आकर्षक, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पर्यावरणपूरक असावी, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. या प्रकल्पामुळे सेवा क्षेत्र, पर्यटन, प्रसारमाध्यमे, इव्हेंट मॅनेजमेंट आणि संबंधित उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणारे केंद्र विकसित व्हावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रकल्पाशी संबंधित निविदा प्रक्रिया, जमीन हस्तांतरण, बांधकाम आणि इतर सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून २०२९ पर्यंत केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
