मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मात्र या मार्गातील पॅकेज ५ मधील नागपूर ते मुंबई दिशेने जाणाऱ्या १० ते १२ किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण असून ते पूर्ण होण्यासाठी लोकार्पणानंतर १५ दिवसाचा कालावधी लागणार आहे. असे असले प्रवाशांना कुठेही वळसा घालावा लागणार नसून समृद्धीवरूनच थेट प्रवास करता येणार आहे. नागपूर ते मुंबईच्या दिशेने जाणारी बाजू तयार असून या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकार्पणानंतर नागपूर ते शिर्डी वाहतूक यावरून सुरू होणार आहे. मात्र या टप्प्यातील नागपूर ते मुंबईच्या दिशेच्या मार्गिकेतील वाशीम येथील १० ते १२ किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे यादरम्यान मुंबई ते नागपूरच्या दिशेने दुतर्फा वाहतूक सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा: ‘समृद्धी’ अपूर्णच, तरीही लोकार्पणाची घाई?; पेट्रोल पंप व इतर सोई-सुविधांची प्रतीक्षाच

नागपूर ते शिर्डी टप्प्यात ४२.८ किमीचा सेलू बाजार, वाशीम ते सिंदखेड राजा, बुलढाणा असा टप्पा-५ आहे. या टप्प्यातील नागपूर ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र मुंबई ते नागपूर दिशेने जाणाऱ्या मार्गिकेतील १० ते १२ किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. यातील दोन पुलांचे काम लोकार्पणापर्यंत होणे शक्य नाही. त्यामुळे एमएसआरडीसीने यादरम्यान तयार मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काम अपूर्ण असले तरी प्रवाशांना थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. १० डिसेंबरला १० ते १२ किमीदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार आहे. पण त्यानंतर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी तसेच हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान १५ दिवस लागणार आहेत. तेव्हा समृद्धीचा थेट ५२० किमीचा टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur to shirdi samriddhi highway will be inaugurated and travel will start from it mumbai print news tmb 01
First published on: 04-12-2022 at 14:14 IST