मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईत पोहचण्यासाठी वाहतूक कोंडाला सामोरे जावे लागते. आमणे येथून दक्षिण मुंबईत पोहचण्यासाठी वाहनांना किमान दोन तास लागतात. यापुढे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईत पोहचता यावे यासाठी राज्य सरकारने ठाण्यात अंदाजे १८ किमी लांबीचा आठ पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
यादृष्टीने चाचपणी सुरू असून हा रस्ता मुंबई – वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्गाला आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या मार्गावरून वाहनांना भविष्यात सागरी मार्ग, सागरी सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार आहे. ठाणे, भिवंडी वा मुंबई शहरात येण्याची गरज वाहनांना पडणार आहे. त्यामुळे नागपूर – दक्षिण मुंबई प्रवास थेट आणि अतिजलद करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे नागपूर – आमणे, भिवंडी प्रवास अवघ्या सात तासांत करता येत आहे. मात्र आमणेवरून पुढे दक्षिण मुंबईत, वरळी, वांद्रे, अंधेरी, दहिसरला जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. आमणे – दक्षिण मुंबई प्रवासासाठी दोन तास लागतात. ही बाब लक्षात घेऊन नागपूरहून थेट दक्षिण मुंबईत कसे पोहचता येईल याचा विचार राज्य सरकारकडून सुरू होता. त्यानुसार आता ठाण्यात एक नवीन आठ पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना पुढे आणल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यानुसार मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग ते ठाणे सागरी किनारा मार्गाला जोडणारा असा हा मार्ग असणार आहे. हा रस्ता नेमका कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल याबाबतची माहिती लवकरच समोर येईल. मात्र हा रस्ता आठ पदरी आणि अंदाजे १८ किमी लांबीचा असणार आहे. हा प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर आहे.
अंदाजे १८ किमी लांबीच्या आठ पदरी रस्त्याची बांधणी कोणत्या सरकारी यंत्रणेकडून केली जाणार हेही अद्याप स्पष्ट नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या उभारणीची जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना भविष्यात आमणेवरून या रस्त्याचा वापर करून उत्तन-विरार सागरी सेतूमार्गे पुढे भाईंदर-वर्सोवा सागरी किनारा मार्गाला आणि त्यानंतर पुढे वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूवरून पुढे जाता येईल.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूने पुढे वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि त्यानंतर मुंबई सागरी किनारा मार्गाने थेट नरिमन पाॅईंटला पोहचता येणार आहे. भिवंडी, ठाणे, मुंबई शहरात येण्याची गरज वाहनांना पडणार नाही. तर मुंबई-वडोदरा महामार्गावरून येणाऱ्या वाहनांनाही समृद्धीला पोहचणे सोपे होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार झाल्यानंतर हा प्रकल्प नेमका कसा आहे हे स्पष्ट होईल.

