मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगाव बीडीडी चाळीतील ५३७ घरांचा समावेश असलेल्या इमारतींना नुकताच निवासी दाखला प्राप्त झाला. त्यामुळे या घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार, ५ जूनपासून ५३७ घरांच्या ताबा प्रक्रियेला मुंबई मंडळाकडून सुरुवात केली जाणार आहे. आता नायगावमधील आणखी ५३७ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
नायगावधील ८६४ रहिवाशांचे स्वप्न याआधीच पूर्ण
मुंबई मंडळाच्या माध्यमातून नायगाव, ना. म.जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. जसजशा इमारती पूर्ण होत आहेत, तसतसा पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सर्वप्रथम वरळीतील ५५६ रहिवाशांना २०२५ मध्ये घरांचा ताबा एका भव्य सोहळ्याचे आयोजन
करून देण्यात आला. तर नायगावमधील ८६४ घरांचा ताबा १६ मार्च २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वरळीतील आणखी ८२७ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. या घरांना निवासी दाखला प्राप्त झाल्याने त्यांचा ताबा देण्यास मे महिन्यात सुरुवात करण्यात आली. घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता नायगावमधील आणखी ५३७ घरांचे काम पूर्ण झाले असून या घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या घरांचाही ताबा आता दिला जाणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
नायगाव येथील इमारत क्रमांक पाचच्या तळमजल्यावरील म्हाडाच्या प्रकल्प कार्यालयात शुक्रवारपासून (५ जून) घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाने दिली. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत घरांचा ताबा दिला जाणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही प्रक्रिया बंद राहणार आहे. दरम्यान, पात्र रहिवाशांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. रहिवाशांनी सदनिका करारनामा, आधार कार्ड आणि पॅनकार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र, सदनिकाधारकांची तीन छायाचित्रे, कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र रहिवाशांना सादर करावी लागणार आहेत. ही कागदपत्रे सादर करून रहिवाशांना आपल्या घरांची स्वप्नपूर्ती करता येणार आहे.
