मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतींमध्ये सध्या पाणीटंचाई असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मात्र हे फेटाळून लावले असून मुबलक पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, रहिवाशांनी अनधिकृतपणे पाण्याच्या टाक्या व मोटार पंप बसविल्याने पाणी वितरण योग्य प्रकारे होत नसल्याची भूमिका मंडळाने घेतली आहे. यावरून रहिवासी आणि मुंबई मंडळात वाद निर्माण झाला आहे. आता मुंबई मंडळाने रहिवाशांना नोटिसा बजावून अनधिकृत पाण्याच्या टाक्या आणि मोटार पंपांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या नोटिशीनुसार, अनधिकृत पाण्याची टाकी आढळल्यास २५ हजार रुपये, तर मोटार पंप आढळल्यास ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. वरळी आणि नायगावमधील काही पुनर्वसित इमारती पूर्ण झाल्या असून, या इमारतींतील घरांचा ताबा देण्यात आला आहे. नायगावमधील पुनर्वसित इमारतींमध्ये काही रहिवासी वास्तव्यास आले आहेत. मात्र, नव्या घरात आल्यापासून त्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. अवघी १५ मिनिटेच पाणी येत असल्याचाही आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी मोर्चे काढले. मात्र तरीही मुंबई मंडळाकडून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रहिवाशांना २५० लिटरपेक्षा अधिक क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यास परवानगी नसताना अनेकांनी मोठ्या टाक्या बसवल्या आहेत. पाणी खेचण्यासाठी मोटार पंप बसविले आहेत. त्यामुळे पाण्याचे वितरण योग्य प्रकारे होत नसल्याचे सांगत याआधी टाक्यांची व पंपांची जोडणी तोडण्याची कारवाई मंडळाने केली. त्यानंतरही पाणीटंचाईचा वाद सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता मंडळाने नोटिसा बजावून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
सदनिकेत २५० लिटरपेक्षा मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आढळल्यास २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे. तर मोटार पंपासाठी ४० हजार रुपये आणि पाणी जोडणीत कोणतीही फेरफार केल्याचे आढळल्यास ५० हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईला लवकरच सुरुवात होणार आहे. मंडळाच्या या निर्णयावर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुळात मुबलक पाणीपुरवठा होत नसताना मंडळाकडून चुकीचे मुद्दे उपस्थित करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
मुबलक पाणीपुरवठा करण्याऐवजी रहिवाशांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे रहिवासी संदीप चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आता मंडळाच्या दंडात्मक कारवाईवरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
