मुंबई : मोठा गाजावाजा करीत प्रशस्त, उत्तुंग इमारतींमध्ये सर्व सुखसोयीयुक्त घरे दिली जात असल्याचा दावा करून मार्चमध्ये नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर एक-एक करत मोठ्या संख्येने रहिवासी प्रशस्त, उत्तुंग इमारतींमध्ये राहण्यास आले आहेत. मात्र नव्या घरात आल्यापासून रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. मागील कित्येक दिवसांपासून रहिवासी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र मंडळाकडून हा प्रश्न सोडविण्याऐवजी रहिवाशांनी घरात पाण्याच्या टाक्या आणि पाण्याचे पंप बसविल्याने पाणीटंचाई होत असल्याची रि ओढत आहेत. मंडळाच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त रहिवासी अखेर बुधवारी रस्त्यावर उतरले. नायगाव प्रकल्पस्थळावरील म्हाडा आणि कंत्राटदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच आठवडाभरात पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर पुनर्विकासाचे काम बंद पाडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नायगाव प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांचा ताबा मार्चपासून दिला जात आहे. यापैकी मोठ्या संख्येने रहिवाशांनी ताबा घेऊन नव्या घरात प्रवेश केला आहे. उत्तुंग इमारतीत, ५०० चौ. फुटांच्या घरात वास्तव्यास आल्याचा आनंद त्यांना आहे. मात्र दुसरीकडे गृहप्रवेश केल्यापासून रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. राज्य सरकार, म्हाडाकडून बीडीडी पुनर्वसित इमारतींना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरजच येथे पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
नायगावमधील पुनर्वसित इमारतींमध्ये सकाळी केवळ १५ ते २० मिनिटेच पाणी येते. त्यात पाण्याचा साठा करण्यासाठी घरांमध्ये म्हाडाकडून टाक्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाणी साठविण्याचा कोणताही पर्याय नाही. परिणामी, रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मुळात पाणीच कमी येत असल्याने पाणीटंचाई असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पाणीसाठा करण्यासाठी टाक्या लावणे गरजेचे असताना म्हाडा त्यास परवानगी देत नसल्याने रहिवाशांनी पाणीसाठा करायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या प्रश्नावर मागील दोन महिन्यांपासून रहिवासी मुंबई मंडळाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र रहिवाशांनी पाण्याच्या टाक्या आणि पंप बसविल्यानेच पाणीटंचाई होत असल्याच्या मुद्द्यावर मंडळाचे अधिकारी ठाम आहेत.
मंडळाने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या टाक्या आणि पंप काढण्याची कारवाई केली. मात्र त्यानंतरही पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून मंडळ आमचा प्रश्न सोडविण्यासाठी उदासीन असल्याचा आरोप करीत रहिवासी मोठ्या संख्येने बुधवारी रस्त्यावर उतरले. प्रकल्पस्थळावरील म्हाडा आणि कंत्राटदाराच्या कार्यालयावर त्यांनी धडक दिली. यावेळी त्यांनी मुबलक पाणीपुरवठ्याची मागणी केली. मात्र अधिकारी टाक्या आणि पंपांच्याच मुद्यावर ठाम होते. मंडळाकडून कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने आता रहिवाशांनी आठवडाभराचा कालावधी दिला आहे. आठवडाभरात मंडळाने हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर आम्ही पुनर्विकासाचे काम बंद पाडू, असा इशारा नायगाव बीडीडीतील रहिवासी मनोज पाडळकर यांनी दिला. घरात वृद्ध मंडळी, लहान मुले आहेत. त्यांची पाण्याअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. पिण्यासाठी आम्हाला पाणी विकत घ्यावे लागत आहे. आम्ही चाळीत असताना आम्हाला तीन तास मुबलक पाणीपुरवठा होत होता. सार्वजनिक बांधकाम विभाग १०० वर्षे जुन्या चाळींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा करू शकते, तर म्हाडाला हे का जमत नाही, असा सवालही त्यांनी केला.
याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, या इमारतींना चार लाख लिटर पाण्याची गरज असताना पाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. तो मुबलक आहे. मात्र मोठ्या संख्येने रहिवाशांनी घरामध्ये पाण्याच्या टाक्या आणि पंप बसविले आहेत. त्यामुळेच पाणीटंचाई होत आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा टाक्या आणि पंप काढून टाकण्याची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रहिवाशांनी मात्र मंडळाच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मुळात पाणीपुरवठा कमी असून पाणीसाठा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था मंडळाने घरामध्ये दिलेली नाही. त्यामुळे पाणीसाठा करण्यासाठी टाक्या गरजेच्याच आहेत. पुरेसा पाणीपुरवठा करण्याकडे मंडळाने लक्ष द्यायला हवे असताना कारवाईची भीती घातली जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. तसेच २५० लिटरच्या टाक्या बसविण्याची परवानगी देण्याची मागणीही रहिवाशांनी केली आहे.
