मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात घराचा ताबा घेतलेले रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त असून, त्यांना पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. आता पाण्याच्या प्रश्नासह एका घरामागे एक वाहनतळाची जागा मिळावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी नायगावमधील रहिवासी रस्त्यावर उतरले. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विरोधात रहिवाशांनी मोर्चा काढला. यावेळी मुंबई मंडळाचा निषेध करण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांवर येत्या काही दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा, मंत्रालयावर धडकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत वरळी बीडीडीवासियांना एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी पुनर्वसनात दोन घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात येत आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात एका चाळीतील रहिवाशांना एक न्याय आणि दुसऱ्या चाळीतील रहिवाशांना वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित करत ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडीवासीयांनीही एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी काही मान्य होताना दिसत नाही. राज्य सरकारकडून नायगाव बीडीडीवासियांना एका घरामागे एक वाहनतळाची जागा देऊ, असे आश्वासन वेळोवेळी देण्यात येत आहे. मात्र, हे कोरडे आश्वासन असून, याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. हीच नाराजी राज्य सरकार, म्हाडापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची माहिती नायगावमधील रहिवासी संदीप चव्हाण यांनी दिली.

एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्याची मागणी मान्य होत नसल्याने, दुसरीकडे पुनर्वसित इमारतींतील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे अखेर गुरुवारी सकाळी ११ वाजता नायगाव बीडीडीतील रहिवासी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने इमारत क्रमांक ७ येथे जमा झाले आणि इमारत क्रमांक ७ ते म्हाडा, कंत्राटदाराच्या प्रकल्पस्थळावरील कार्यालय असा मोर्चा त्यांनी काढला. यावेळी मुंबई मंडळाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रहिवाशांनी महिना २५ हजार रुपये घरभाड्याऐवजी ३५ हजार रुपये घरभाडे मिळावे आणि खेळाचे मैदान एका कोपऱ्यात न देता इमारतींच्या मधोमध द्यावे, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे माडण्यात येतील, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. तर येत्या काही दिवसांत आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर आम्ही म्हाडावर मोर्चा काढू. या मोर्चानंतरही मागण्यांकडे कानाडोळा केला, तर मंत्रालयावर धडकू, असा इशाराही रहिवाशांनी दिला. याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.