Nair dental hospital to set up modern laboratory mumbai | Loksatta

मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा

सिम्युलेटर दंत प्रयोगशाळेमध्ये संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणाऱ्या ५५ खुर्च्या असणार आहेत. एका खुर्चीवर दोन असे ११० विद्यार्थी एका वेळी दंत उपचाराचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा
नायर रुग्णालय (संग्रहित छायाचित्र)

दंत शस्त्रक्रिया पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी नायर दंत रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सिम्युलेटर दंत प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेत त्यांना रुग्णाच्या प्रतिकृतीवर अद्ययावत व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी प्रावीण्य मिळवण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा- रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही

दंत शस्त्रक्रिया पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षामध्ये प्रतिकृतीवर प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर तिसऱ्या वर्गामध्ये प्रत्यक्ष रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येते. नायर दंत रुग्णालयामध्ये आतापर्यंत पारंपरिक पद्धतीच्या प्रतिकृतीवर विद्यार्थ्यांना सराव करून प्रशिक्षण घ्यावे लागत होते. मात्र, विद्यार्थ्यांना अद्ययावत व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रशिक्षण मिळावे यासाठी सिम्युलेटर दंत प्रयोगशाळा (सिम्युलेटर डेंटल लॅब) सुरू करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्णत: अद्ययावत, इलेक्ट्रॉनिक खुर्च्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रॉनिक खुर्च्यामध्ये दंत उपचारासाठी लागणारे सर्व साहित्य अद्ययावत व आधुनिक असणार आहे. या खुर्चीमध्ये मनुष्याच्या तोंडातील दातांची संरचना असलेली डोक्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रतिकृतीमध्ये दात काढणे, दात बसविणे, दातांच्या मुळांच्या वाहिन्यांचा मार्ग बदलणे, दातांवर आवरण बसविणे, हिरड्यांची सूज अशा दातांसदर्भातील विविध आजारांवर विद्यार्थ्यांना सराव करता येणार आहे. या सरावासाठी विद्यार्थ्यांना सर्व उपकरणे व साहित्य हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणार असणार आहेत. ही खुर्ची पूर्णत: इलेक्ट्रॉनिक असणार असल्याने विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यापुढे पारंपरिक पद्धतीऐवजी अद्ययावत यंत्राद्वारे होणार आहे.

हेही वाचा- ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

सिम्युलेटर दंत प्रयोगशाळेमध्ये संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणाऱ्या ५५ खुर्च्या असणार आहेत. या प्रत्येक खुर्चीवर दोन प्रतिकृती असणार आहेत. एका वेळी दोन विद्यार्थ्यांना एका खुर्चीवर प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे ११० विद्यार्थी एका वेळी दंत उपचाराचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. ही प्रयोगशाळा नायर दंत रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रयोगशाळा रुग्णालयाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नायर दंत रुग्णालय व महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 21:51 IST
Next Story
मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन