Nair Hospital doctors practiced directly on the human body first time facility government hospital Mumbai print news ysh 95 | Loksatta

नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरला शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण प्लास्टिक किंवा रबरच्या प्रतिकृतीवर करावे लागते.

surgery
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई : वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरला शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण प्लास्टिक किंवा रबरच्या प्रतिकृतीवर करावे लागते. यामुळे शस्त्रक्रियेमध्ये कौशल्य मिळविण्यास डॉक्टरांना बराच वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर नायर रुग्णालयामध्ये २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमध्ये (सर्जिकल स्किल लॅबोरेटरी) पहिल्याच दिवशी तब्बल ३६ डॉक्टरांना सुघटनशल्याचे प्रशिक्षण घेता आले. या ३६ डॉक्टरांना देशातील सर्वोत्कृष्ट १५ वरिष्ठ सुघटनशल्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे डॉक्टरांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनाही प्रत्यक्ष मानवी शरीरावर शस्त्रक्रियेचा सराव करता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेमध्ये पारंगत हाेण्यास बराच वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता नायर रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. अमरेश बलियार सिंग यांनी २०१२ मध्ये अत्याधुनिक शव विच्छेदन प्रयोगशाळा उभारण्याची संकल्पना मांडली होती. गुलाबचंद फाऊंडेशनच्या माध्यमातून ही प्रयोगशाळा त्यांनी उभारली होती. डॉ. उदय भट यांनी ही संकल्पना पुढे नेत नायर रुग्णालयामध्ये अद्ययावत व आधुनिक शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळा उभारली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन २७ जानेवारीला नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रयोगशाळेत प्रथमच सुघटनशल्य विभागाच्या डॉक्टरांना चेहऱ्यावरील विविध शस्त्रक्रिया करण्याची संधी देण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबईच्या अनेक भागात ४८ तास पाण्याविना, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक विभागात पाणी पुरवठा झालाच नाही

प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी झालेल्या प्रशिक्षणामध्ये देशातील ३६ डॉक्टर सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या डॉक्टरांना चेहऱ्यावरील विविध शस्त्रक्रियेतील बारकावे यावेळी शिकविण्यात आले. सुघटनशल्यातील विविध बारकावे जगातील सर्वोत्कृष्ट सुघटनशल्य तज्ज्ञांकडून करण्यात आले. यामध्ये जी.टी. रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. नितीन मोकल, नायर रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. उदय भट, हिंदुजा आणि लिलावती रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे सल्लागार डॉ. मिलिंद वाघ, केईएम रुग्णालयातील प्रा. डॉ. कपिल अगरवाल, नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे सल्लागार प्रा. डॉ. आदित्य अगरवाल यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती नायर रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. उदय भट यांनी दिली.

हेही वाचा >>> वसई-विरारची तहान मार्चपासून भागणार, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांसाठीही प्रशिक्षण

शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमध्ये पहिल्या दिवशी सुघटनशल्य विभागाचे प्रशिक्षण झाल्यानंतर या प्रयोगााळेत टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना कर्करोगासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर न्यूरो सर्जरी आणि अस्थिव्यंग शल्यचिकित्सा विभागामार्फत सराव प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. उदय भट यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 13:29 IST
Next Story
मुंबईच्या अनेक भागात ४८ तास पाण्याविना, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक विभागात पाणी पुरवठा झालाच नाही