scorecardresearch

“देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता….”; नायर रूग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्र्याचं विधान

नायर रूग्णालय हे जिद्दीचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचं सांगत, डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाचा वर्षाव

“देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता….”; नायर रूग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्र्याचं विधान

मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालायाचा आज शतकपूर्ती सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात रूग्णालयाने केलेल्या कामासह डॉक्टर्स व समस्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेचे जाहीरपणे कौतुक केले. तसेच, नायर रूग्णालय हे जिद्दीचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.

यावेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, “आशीर्वाद प्रत्यक्ष रुपात आणणारी संस्था जेव्हा शतायुषी होते, त्यावेळेला एक समाधान काही वेगळच असतं. मी केवळ कौतुक करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंद करू शकतो. मात्र आता जो एक लुघूपट दाखवला गेला, या संस्थेच्या स्थापनेचा आणि तिथपासून ते आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. काही वेळेला अशाही गोष्टी घडतात की सुरूवात होते, पण ती गोष्ट टिकवणं फार कठीण असते. मला आज अभिमान आहे की या संस्थेने त्या प्रतिकुल काळात केलेलं काम म्हणजे जिद्द असलं तर काय होऊ शकतं याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. जिद्द हवी, जिद्दच नसेल तर सगळ्या गोष्टी असूनही काही उपयोग नाही. जिद्द असेल तर काही नसलं तरी सर्वकाही करता येऊ शकतं हे या संस्थने प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वतः जीव ओतून इतरांना जीवदान देणं. हे फार महत्वाचं काम मागील १०० वर्षात इथल्या डॉक्टरांनी व त्यांच्या बरोबरीने सर्व परिचारिका, वॉर्डबॉय रूग्णालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनतीने केलं.”

तसेच, “मी मागेही असं म्हटलं होतं की जेव्हा लॉकडाउनची सुरूवात झाली, की मंदिरं बंद आहेत. प्रार्थनास्थळं बंद आहेत. मग देव आहे कुठे? आणि तेच माझं म्हणणं आजही आहे. देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रुपाने आपल्या सोबत, आपला जीव वाचवण्यासाठी आलेला आहे. हा खरा देव आहे, जो आपला जीव वाचवतोय. हे रूग्णालय देखील एखाद्या मंदिरासारखं आहे. व्यथा घेऊन जसं कुणी मंदिरात जातं, तसं कधीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन, त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात आणि त्यांच्यापैकी बहुतेकजण व्यवस्थित होऊन, हसतखेळत घरी जातात. हे तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो.” असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “कोविडमध्ये या रूग्णालयाने काय काय केलं? हे पुन्हा मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पण खरचं आहे की, हे आपलं सरकार जेमतेम दोन-तीन महिने झाले असतील नसतील आणि त्यामध्ये हे अनपेक्षित व आज देखील अनाकलनीय म्हणजे काही कळतच नाही. असं संकट आलं, व्हायरस सुरूवातीचे दिवस काय नंतरचे दिवस काय कठीणच होते. पण विशेषता सुरूवातीच्या दिवसांमध्ये एक अशी प्रचंड दहशत होती, की काही वेळेला डॉक्टर देखील रूग्णांना तपासायला घाबरत होते. आज सगळं ठीक आहे, आज मुंबई मॉडेलचं कौतुक होतय, महाराष्ट्राचं कौतुक होतंय, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं कौतुक होतंय. पण मी नम्रपणाने प्रत्येक वेळी सांगतो, तेच आजही सांगतोय, की या कौतुकाचे खरे मानकरी आपण सर्व डॉक्टर्स आणि आपले आरोग्य कर्मचारी आहेत.” असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या