मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) निर्धारित केलेल्या किमान मानक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीकाेनातून नायर रुग्णालयात अत्याधुनिक अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग नव्याने स्थापन करण्यात आले. अत्याधुनिक आणि नवनिर्मित ‘अपघात आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग संकुल’ सोमवारपासून सुरू करण्यात आले. यामुळे नायर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी पक्ष गटनेता व स्थानिक नगरसेविका अमरिन अब्राहनी, सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेवक अजय पाटील, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन संकुलाची व विभागांचे अनावरण करण्यात आले. नायर रुग्णालयाच्या विस्ताराअंतर्गत हाती घेतलेल्या ‘प्राईम प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट’मधील हा एक प्रमुख आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.

नवीन संकुलाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर २५ जून रोजी हे संकुल नायर रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या नवीन संकुलामुळे रुग्णालयाच्या पुढील टप्प्यातील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन इमारत तयार झाली असल्याने आता जुनी अपघात विभाग इमारत पाडून त्या ठिकाणी २० मजली आधुनिक निवासी वैद्यकीय अधिकारी निवासस्थान बांधले जाणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या विभागाचे कामकाज दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात अपघात विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ट्रायज वॉर्ड, बालरोग, अस्थिव्यंगोपचार, शस्त्रक्रिया आणि लघु शस्त्रक्रियागृह यांसारख्या मुख्य उपचार सेवा तत्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात प्रगत आपत्कालीन निदान व चाचणी सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

रुग्णांची त्वरित तपासणी, उपचार आणि प्राथमिक निदान करण्याच्यादृष्टीने तळ मजला तयार करण्यात आला आहे. स्वतंत्र योजना नोंदणी कार्यालय, अपघात वैद्यकीय अधिकारी कक्ष, सामान्य औषधशास्त्र, सामान्य शस्त्रक्रिया, बालरोग आणि अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांसाठी स्वतंत्र कक्ष, एक सामान्य तपासणी कक्ष, सर्व सुविधांनी सज्ज असलेला आठ खाटांचा आपत्कालीन वैद्यकीय सेवा कक्ष, क्ष किरण कक्ष, रुग्ण निर्जंतुकीकरण कक्ष आणि रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण होईपर्यंत, मृतदेह सन्मानाने ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘शवगृह क्षेत्र तळ मजल्यावर आहे.

पहिला मजला हा रुग्णांच्या देखरेखीसाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी राखीव आहे. आणिबाणीच्या प्रसंगी २१ खाटांचा निरीक्षण विभाग, रक्त तपासणी केंद्र, सल्लागार कक्ष, वैद्यकीय साहित्याचा राखीव साठा करण्यासाठी विशेष आपत्कालिन सज्जता केंद्र या मजल्यावर आहे.