विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल बनवून एका तरुणाने अनेक तरुणी आणि महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. त्याने कसलाच पुरावा मागे ठेवला नव्हता. फसवल्या गेलेल्या तरुणीदेखील तक्रारी देत नव्हत्या. त्याला पकडणं पोलिसांपुढे मोठं आव्हान बनलं होतं.

संगणक अभियंता असलेली ३० वर्षीय तरुणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना जे सांगितलं ते ऐकून पोलीस चक्रावून गेले. विवाहविषयक संकेतस्थळावर भेटलेल्या एका भामटय़ाने तिला नऊ लाख रुपयांना फसवून पोबारा केला होता. उच्चपदस्थ अधिकारी, महिन्याला तीन लाख पगार, मुंबईत स्थावर मालमत्ता असल्याचे त्याने भासवले होते. लग्नासाठी होकार देऊन भेटायला बोलावले. तेथे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी नऊ लाख रुपये भरायचे असल्याचे तिला सांगितले. त्याच्या बोलण्याला भुललेल्या या तरुणीने नऊ लाख रुपये दिलेच; पण सोबत लग्नासाठी बनवलेल्या दोन सोन्याच्या अंगठय़ाही त्याच्याकडे सोपवल्या. पण हा ठकसेन पैसे मिळताच पसार झाला.

कृष्णा देवकाते (३०) हा भामटा क्षितिज आणि प्राज्वल देशमुख नावाने शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर आपले खोटे प्रोफाइल बनवायचा. ऑस्ट्रेलियात नोकरी करून भारतात रिलायन्स कंपनीत कामाला आहे असे सांगयचा. बनावट फेसबुक खात्यावरही श्रीमंतीचा थाट उभा केला होता. भवन्स महाविद्यालयात शिक्षण झाले होते. इंग्रजी उत्तम होते. त्याद्वारे तो लग्नासाठी इच्छुक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा. पैसा उकळायचा तर श्रीमंत मुली हव्या म्हणून तो नोकरी करणाऱ्या उच्चपदस्थ तरुणी, वयस्क महिला, विधवा आणि घटस्फोटित महिलांना लक्ष्य बनवायचा.

पोलिसांकडे आरोपीचा फक्त नंबर आणि फोटो होता. बाकी त्याची सगळी माहिती खोटी होती. तो वापरत असलेला नंबर खोटय़ा नाव आणि पत्त्यावर घेतलेला होता. पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर काढून तपासला. तर २० मुलींच्या तो संपर्कात असल्याचे समजले. त्या क्रमांकावरून या मुलींनाच फोन करायचा आणि त्यांचेच फोन येत होते. पोलिसांना अंदाज आला की, हे प्रकरण दिसतं तेवढं सोप्पं नाही. आरोपी हा सराईत होता आणि त्याला पकडणं आव्हान बनलं होतं. नालासोपाऱ्याचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे पथक कामाला लागले.

देवकाते याने मागे काहीच पुरावा ठेवलेला नव्हता. नुसतं फोटोवरून शोधणं कठीण होतं. पोलिसांनी या फसवलेल्यया मुलींकडे चौकशी केली. बदनामीपोटी कुणी तक्रार देण्यास तयार नव्हतं. तो भेटायला येताना ओला कॅब किंवा उबेर टॅक्सी करून यायचा. हॉटेलात भेटायचा. रात्री त्याचा फोन बंद व्हायचा. फक्त दिवसाच तो मुलींशी बोलत असायचा. त्याने मोबाइल क्रमांक बनावट पत्त्यावर घेतला होता. त्यामुळे त्याला पकडायचं कसं, असा पोलिसांना प्रश्न पडला.

पोलिसांनी एक नामी युक्ती केली. एका मुलीच्या नावाने बनावट खाते तयार केले आणि त्याच्या खात्यावर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून लग्नासाठी इच्छुक असल्याचं भासवलं. या मुलीलाही भरघोस पगार, संपत्ती असल्याचं दाखवलं. आयतं सावज जाळ्यात आलं म्हणून तो भेटायला येईल असा पोलिसांचा कयास होता. पण त्याने काही दाद दिली नाही. पोलिसांचा हा प्रयत्न फसला. देवकाते हा हुशार होता. तो सावधगिरी म्हणून लवकर मुलींना भेटत नव्हता. किमान ८- ९ वेळा तरी भेटायला येतो, असे सांगून ऐनवेळी रद्द करायचा. त्यानंतरच तो भेटायचा. म्हणजेत तो प्रत्येक पाऊल जपून टाकत होता.

पोलिसांनी हिम्मत न हारता पुन्हा या तरुणींकडे चौकशी केली. तेव्हा एक तरुणी म्हणाली, मला भेटायला येताना तो गाडी घेऊन यायचा. तिला त्या गाडीचा नंबर माहिती नव्हता. पण त्या गाडीवर ‘क्षितिज’ हे नाव लिहिलेलं होतं. पोलिसांना हाच दुवा पुरेसा होता. पण क्षितिज नावाची गाडी शोधायची कशी. साहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी तर्क लावला. आरोपीचा फोन रात्री घोडबंदरच्या परिसरात बंद होत होता. मग पोलिसांनी घोडबंदर येथे क्षितिज नावाची गाडी कुणी पाहिली का ते शोधायला सुरुवात केली. अर्थात हे फार कठीण काम होतं. कारण अशा प्रकारे गाडी शोधणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं होतं. पोलिसांनी हिम्मत न हारता क्षितिज नावाची गाडी दिसते का त्याचा शोध सुरू केला. पोलिसांच्या प्रयत्नांना थोडं यश आलं. एका सुरक्षा रक्षकाने सांगितलं की, पाटणकर पार्क  येथे ही गाडी जाताना दिसते. पाटणकर पार्क हादेखील मोठा परिसर होता. तेथेही ६० -७०  इमारती. त्यातून गाडी शोधायची म्हणजे पुन्हा दिव्य. पोलिसांनी मग शोध घेतला आणि एका झाडाच्या आडोशाला गाडी दिसली. पोलिसांनी रात्रभर सापळा लावला आणि सकाळी मोठय़ा थाटात गाडीत येऊन बसलेल्या कृष्णा देवकातेच्या मुसक्या आवळल्या.

कृष्णा देवकाते ठाण्याच्या ओवळे येथील पुराणिक सिटी येथे पत्नी, आई-वडील आणि एक वर्षांच्या क्षितिज नावाच्या मुलासह राहतो. त्याचे वडील अन्न व औषध प्रशासन विभागातून निवृत्त झाले होते. पदवीधर असलेला कृष्णा एका कंपनीत काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याची नोकरी गेली. त्यात त्याने कर्ज काढलं. कर्ज काढणाऱ्या कंपनीने त्याला फसवलं. फसवणं इतकं सोप असतं हे त्याच्या लक्षात आलं. त्यातच त्याने एक लेख वाचला. मॅट्रिमोनिअल साइटवर बनवाट खाते उघडून मुलींना गंडा घालता येतो याचा त्याने विचार केला. २०१२ पासून त्याने अनेक मुलींना फसवले. अभियंत्या, आयटी क्षेत्रातीलस बहुराष्ट्रीय कंपनीतील, उच्च न्यायालयातील महिला, डॉक्टर त्याच्या सावज बनल्या. त्याला कुणाला फसवले त्यांची नावेदेखील आठवत नाही. त्याने बक्कळ पैसा कमवला. तो पत्नीला घरखर्चाला महिन्याला एक लाख रुपये द्यायचा. सकाळी १० वाजता घर सोडून संध्याकाळी सहा वाजता परत यायचा.

एकाच वेळी तो १५ ते २० तरुणींना जाळ्यात ओढायचा. अनेक मुलींच्या घरीदेखील जाऊन आला होता. मुलगी फसली हे लक्षात आल्यावर व्यवसायात अचानक तोटा झाला, कार्ड ब्लॉक झालं, शेअर बाजारात पैसे भरायचेत, असे सांगून तो भावनिक ब्लॅकमेल करून पैसे घ्यायचा. प्रत्येक तरुणीला त्याने किमान एक लाखाहून अधिक रकमेला गंडा घातला आहे. काही तरुणींशी त्याने अश्लील संभाषण केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत का ते पोलीस तपासत आहेत. सध्या पाच तरुणींनी त्याच्याविरोधात तक्रारी दिल्या असून पोलिसांनी ते गुन्हे राज्यातील संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग केले आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकातील प्रकाश साईल, संतोष सुर्वे, ज्ञानेश्वर माचीवाल, रुस्तम राठोड, हर्षल चव्हाण आदींनी या भामटय़ाला पकडण्यात मोलाची भूमिका बजावली.

सुहास बिऱ्हाडे @suhas_news