मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पालघर आणि नालासोपारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा बुधवारी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने वसई रोड नालासोपारा – विरारदरम्यान लोकलची संख्या कमी करून, लोकल मोठ्या अंतराने चालविण्यात येत होत्या.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम नालासोपारा परिसरात झाला असून, काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. परिणामी, आवश्यकतेनुसार काही वेळा सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावी लागली. चर्चगेट – वसई रोड आणि विरार – डहाणू रोड या मार्गांवर लोकल सुरू होत्या. चर्चगेट – वसई रोडदरम्यान लोकल नियमित सुरू असली तरी वसई रोड – नालासोपारा – विरार या पट्ट्यात पाणी साचल्यामुळे फटका बसला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वसई रोड – विरार स्थानकांदरम्यान वेगमर्यादा लागू करून लोकल चालविण्यात आल्या. चर्चगेट – वसई रोडदरम्यानची लोकल सेवा सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. जलद लोकल अर्ध्या तासाने स्थानकात येत होत्या. तर, धीम्या लोकलला १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

रेल्वे रुळावरील गुडघाभर पाण्यात पायपीट

चर्चगेट – वसई रोडदरम्यानची लोकल सेवा सुरू असल्याने, अनेक प्रवासी वसई रोडपर्यंत आले. वसई रोड – विरारदरम्यानची लोकल सेवा बंद होती. तर, विरार – डहाणू रोड लोकल सेवा सुरू होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पुढील प्रवास करण्यासाठी रेल्वे रुळावरील गुडघाभर पाण्यातून पायपीट केली. काही प्रवाशांना नालासोपारा, काहींना विरारपर्यंत जायचे होते. त्यामुळे प्रवाशांना वसई रोड – नालासोपारादरम्यान ४ किमी आणि वसई रोड -ते विरारदरम्यानचे ८ किमी अंतर पायपीट करावी लागली.

मेल-एक्स्प्रेसमधून लोकल प्रवाशांचा प्रवास

विरारवरून चर्चगेट दिशेकडे जाणारी आणि वसई रोडवरून विरार दिशेकडे जाणारी लोकल सेवा बंद होती. परंतु, लांब पल्लाच्या रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावत होत्या. यावेळी अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून लोकल प्रवाशांनी प्रवास केला. या रेल्वेगाडीला वसई आणि विरार स्थानकात थांबा दिला होता.

सोमवार, ६ जुलै

सकाळी ९ वाजता वसई रोड–विरार लोकल सेवा स्थगित केली. – चर्चगेट – वसई रोड आणि विरार – डहाणू रोड लोकल सेवा सुरू होती.

मंगळवार, ७ जुलै

मंगळवारी पहाटे ३.५७ वाजेच्या सुमारास विरारवरून चर्चगेटसाठी लोकल निघाली. – पावसाचा जोर वाढल्याने, दुपारी ४.१५ वाजता वसई रोड – विरार लोकल सेवा स्थगित करण्यात आली.

बुधवार, ८ जुलै

सकाळी ७ वाजता चर्चगेट ते डहाणू रोड लोकल सेवा सुरू – सकाळी ९.३० वाजता वसई रोड – विरार दरम्यान मर्यादित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात – सायंकाळी ५ पर्यंत मर्यादित लोकल फेऱ्या चालवण्यात येत होत्या.