मुंबई : सर्व दुकाने, आस्थापनांवर ठळक शब्दात मराठी नामफलक बसवण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेल्या ३१ मेच्या मुदतीला इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) विरोध केला आहे. ही मुदत कमी असून किमान सहा महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
दुकानांचे नामफलक मराठी भाषेत असावेत याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने सर्व दुकानदार व आस्थापना मालकांसाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, अन्य भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. मराठी नामफलकाबरोबरच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे नसावी, असाही नियम लागू करण्यात आला आहे. सर्व आस्थापनांना नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी पालिकेने ३१ मे २०२२ पर्यंत मुदत दिली आहे.
मद्य पुरविण्यात येणाऱ्या किंवा विकण्यात येणाऱ्या आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे असल्यास नियमानुसार त्यात आवश्यक तो बदल करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे नाहीत, परंतु नामफलक मराठीत नाही त्यांना मराठी नामफलक लावण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य सरकारचा निर्णय आम्हाला मान्य असून त्याची अंमलबजावणी करण्याची आमची तयारी आहे. मात्र ३१ मेपर्यंतची मुदत कमी असल्याचे मत आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी किमान सहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.