मुंबई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ नाकारण्यात येत आहे. त्यामुळे, आधीच संवेदनशील बनलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जून २०२३ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात सुरू केली होती.

पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात प्रती हप्ता दोन हजार, असे तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये नमो योजनेअंतर्गत दिले जातात. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे ५६ लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षासाठी बाद होणार आहेत. थोडक्यात नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नमो महासन्मान योजनेच्या अंतर्गत आजवर ९३.०८ लाख शेतकऱ्यांना आठ हप्त्यांमध्ये १४,८१६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे आर्थिक वर्ष २०२६ – २७ मधील या योजनेचा डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै, या काळातील दोन हप्त्यांचे वितरण रखडले आहे. कृषी आयुक्तालयाने नुकताच या दोन हप्त्यांच्या निधीचा प्रस्ताव सरकारला पाठविला.

एका हाताने मदत…

कर्जमाफी योजनेतील अटींवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आता एका हाताने कर्जमाफी देताना, दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी सहा हजार रुपयांची हक्काची मदत रोखली जाणार आहे. कर्जमुक्तीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कृषी विभागाची कोंडी

नमो महासन्मान योजना कृषी विभागाची आहे. एल – निनोमुळे कमी पाऊस अथवा दुष्काळजन्य स्थितीची शक्यता आहे. पेरणी योग्य पाऊस होऊन समाधानकारक पेरण्या झाल्या असल्या तरीही, आता पावसाने ओढ दिली आहे. मराठवाडा, विदर्भात पिकांना आता पावसाची गरज आहे. कोकण किनारपट्टीवर अजून भात लावणी सुरू आहे. दुष्काळजन्य स्थितीच्या शक्यतेमुळे कृषी विभागाची मोठी कोंडी झाली आहे. मध्यम मार्ग म्हणून कर्जमाफीचा कमी लाभ (२५ हजार रुपयांपर्यंत) मिळणाऱ्या शेतकऱ्यांना महासन्मानचा लाभ सुरू ठेवण्याचा विचार कृषी विभागात सुरू आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

वर्षलाभार्थी शेतकरी (लाख)रक्कम (कोटी)
२०२३-२४८७.४२५,३०४
२०२४-२५ ९३.०० ५,८२५
२०२५-२६ ९१.०० ३,६८५