मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार हजार रुपयांचे दोन हप्त सरकारने थकविले आहेत, ते पैसे न देता आता दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा आग्रीम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही निव्वळ धूळफेक आहे, एका हाताने शेतकऱ्यांची मदत थांबवून ठेवायची आणि दुसऱ्या हाताने मदत दिल्याचा आव आणायचा, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा आरोप शेतकरी संघटनांनी केली आहे.
किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मार्च २०२५ आणि जून २०२६, हे हप्ते थकविले आहेत. आता रब्बी हंगामासाठीचा हप्ता देय आहे. एकीकडे यापूर्वी जाहीर केलेली चार हजार रुपयांची मदत थांबवून ठेवायची आणि दुसरीकडे दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा आग्रीम जाहीर करायचा, ही निव्वळ धूळफेक आहे. शेतकऱ्यांचे थांबविलेले पैसेच त्यांना दिले जात आहेत, मदतीचा निव्वळ देखावा तयार केला जात आहे, अशी टीका नवले यांनी केली आहे.
शेतकऱ्यांबाबत सरकारचे दुटप्पी धोरण
शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, मात्र दुसरीकडे नमो किसान योजनेचे दोन हप्ते थकवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असलेले सुमारे ३,७०० कोटी रुपये तातडीने जमा करा. शेतकऱ्यांना अग्रीम मदत देण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे शेतकरी सन्मान निधीचे हप्ते थकवायचे, हे सरकारचे दुटप्पी धोरण आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असे धोरण पाहायला मिळाले नाही. एकीकडे शेतकरी दुष्काळाशी सामना करत असताना दुसरीकडे महागाईने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत पुरेशी कशी ठरणार, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
वित्त विभागाकडे प्रस्ताव पडून
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंगे यांनी १५ जून २०२३ पासून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती. पीएम किसानचा हप्ता मिळालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार होते. या योजनेचा मार्च २०२५ आणि जून २०२६, चा हप्ता अद्याप वर्ग करण्यात आला नाही. हा निधी वर्ग करण्यात यावा, यासाठी कृषी विभागाकडून वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पण, वित्त विभागाकडून अद्याप त्या बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
थकीत रक्कम अगोदर द्या
एकीकडे चार हजार रुपये थकवायचे आणि दुसरीकडे पाच हजार देऊन श्रेय घ्यायचे, हे बरोबर नाही. सरकारने थकीत रक्कम अगोदर द्यावी, त्यानंतर पाच हजारांचा अग्रीम दिल्याबद्दल पाठ थोपटून घ्यावी, अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
