रंगभूमी वा चित्रपटाचा रुपेरी पडद्यावरील त्यांच्या भूमिका असतो किंवा ‘नाम’च्या माध्यमातून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाशी जोडले जाणे असो, मुंबई-पुण्यातल्या त्यांच्या घरी त्यांनी अनुभवलेला अगदी मोठमोठ्या हस्तींचा आपुलकीचा सहवास असो… सगळीकडे ‘नाना पाटेकर’ नावाच्या किमयागाराने आपले असे खास अस्तित्व मागे सोडले आहे. त्यांनी जे जे केले, त्यापेक्षाही अधिक काहीतरी त्यांना पाहणार्या, त्यांना अनुभवलेल्या प्रत्येकाला गवसलेले आहे, मनात साठलेले आहे. म्हणूनच गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त वार्यासारखे येऊन कानात शिरले तेव्हा अनेकांना ही गोष्ट अशक्यप्राय वाटत राहिली.
नाना पाटेकर यांच्यासारखा मनस्वी माणूस, अद्भुत कलावंत कधी अशा पद्धतीने आयुष्याचा रंगपट सोडून जाऊच शकत नाही. अमरत्वाचे वरदान लाभलेला हा कलावंत आहे जणू… इतकी दृढ भावना त्यांच्या चाहत्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. मुरुड-जंजिर्यामध्ये लहानाचे मोठे झालेल्या विश्वनाथ गजानन पाटेकर यांच्याकडे अशी नेमकी काय किमया होती की त्यांनी साकारलेल्या भूमिकांशी प्रेक्षक इतक्या आत्मियतेने जोडले गेले? नानांचा अभिनय हा वास्तव आयुष्यातल्या अनुभवातून आलेला अर्क होता.
नानांचे वडील गजानन पाटेकर यांना व्यवसायात आलेले अपयश, वडिलांचे अकाली निधन आणि अवघ्या तेराव्या वर्षी त्यांच्यावर येऊन पडलेली घरची जबाबदारी, या संघर्षातून त्यांच्यातील माणूसपण आणि कलाकार घडत गेला. शाळकरी वयात सिनेमाचे पोस्टर्स रंगवून उदरनिर्वाह करणार्या नानांनी जे. जे. इ्स्टिटट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून शिक्षण घेतले. नाटक पाहण्याची आवड त्यांच्या मनात वडिलांमुळे रुजली होती. हीच आवड त्यांना रंगभूमीपर्यंत घेऊन आली. विजयाबाई मेहता यांच्या तालमीत नाट्याभिनयाचे धडे त्यांनी गिरवले.
रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपण जो काही अभिनय केला, तो विजयाबाईंमुळेच… असे ते सांगत असत. ‘पुरुष’ नाटकातील त्यांची भूमिका अत्यंत गाजली. या नाटकात त्यांनी खलपुरुष साकारला होता आणि ते रंगभूमीवर आले की प्रेक्षकांनाही त्यांच्या पात्राची दहशत वाटत असे. मात्र, या नाटकाबद्दल बोलताना माझे काम सगळ्यात चांगले नव्हते, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. या नाटकात चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, रिमा लागू असे ताकदीचे कलावंत होते.
माझा क्रमांक त्यांच्यामागे म्हणजे चौथा वगैरे म्हणता येईल, असे सांगणार्या नानांनी १६ वर्षे हे नाटक केले. या नाटकाचे त्यांनी १ हजार ८६० प्रयोग केले. ‘१९८९ साली या नाटकाच्या प्रयोगसाठी आम्ही पाच लाख रुपये आकारत होतो,’ असेही नानांनी सांगितले होते. रंगभूमीवर ‘पुरुष’ या नाटकाबरोबर ‘हमीदाबाईची कोठी’ आणि ‘महासागर’ अशी तीनच व्यावसायिक नाटके त्यांनी केली होती. प्रायोगिक रंगभूमी आणि नाट्यस्पर्धांमधील केलेले नाट्यप्रयोग वगळता त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार काम केले नाही.
अभिनेत्री स्मिता पाटील यांनी नानांना चित्रपट माध्यमात काम करण्याचा आग्रह धरला आणि नानांनी १९७८ साली आलेल्या ‘गमन’ या हिंदी चित्रपटात छोटेखानी भूमिकेतून पदार्पण केले. ‘गमन’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना फारशी ओळख मिळवून दिली नाही. त्यानंतरही चांगल्या भूमिका मिळवण्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.
हिंदीत अंकुश आणि मराठीत माफीचा साक्षीदार या १९८६ साली आलेल्या चित्रपटांतून नानांनी चित्रपट निर्माते, समीक्षक आणि प्रेक्षक यांचे लक्ष वेधून घेतले. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटातील भूमिकेने त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. पण, त्यानंतर वर्षभराने प्रदर्शित झालेल्या विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयाला खरी दाद मिळाली.
ऐंशी आणि नव्वदचे दशक हे खर्या अर्थाने नाना पाटेकर यांनी गाजवले. ‘स्टार’ कलाकारांच्या जोरावर चालणार्या हिंदी चित्रपटसृष्टीला नाना पाटेकर यांच्यासारख्या सामान्य चेहर्याच्या कलाकाराने विलक्षण अभिनयाच्या जोरावर आपली दखल घ्यायला लावली. १९९१ मध्ये नानांनी दिग्दर्शित केलेला ‘प्रहार : द फायनल अटॅक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. नानांनी यात सैन्य अधिकार्याची
भूमिका केली होती म्हणण्यापेक्षा ते ही भूमिका जगले होते. चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून नानांनी तीन वर्षे सैन्याचे प्रशिक्षण घेतलेे.
‘नटसम्राट’ला मिळालेली दाद…
’ नाना पाटेकर यांनी मराठीत त्या तुलनेत फार निवडक भूमिका केल्या. २०११ साली प्रदर्शित झालेला उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’, समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’, सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला माणूस’ ते अलीकडचा म्हणता येईल असा विपुल मेहता दिग्दर्शित ‘ओले आले’ या प्रत्येक चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा गाजली.
’ ‘नटसम्राट’ चित्रपटातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका नाना खर्या अर्थाने जगले, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगतात. खुद्द नानांना या भूमिकेविषयी छेडले असता त्यांनी याचे श्रेय डॉ. श्रीराम लागू यांना दिले होते. ‘डॉ. लागूंनी केलेले नटसम्राट हे नाटक मी रंगभूमीवर ४० वेळा तरी पाहिलेले होते.
* चित्रपटात ही भूमिका करताना माझ्याकडे काही गोष्टी तयार होत्या, ज्याचा मी उपयोग करून घेतला’, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. सतत माणसांशी संवाद साधत राहणार्या, त्याला जोडून घेणार्या नानांनी आपली-परकी माणसं मनात खोलवर झिरपवली होती.
* अभ्यास-निरीक्षणातून त्यांनी आत्म्याचा हा अनुभव आणि बाह्य जगतातील गोष्टींचा मेळ साधत आपल्यातील कला अधिक टोकदार केली. चित्रपटाच्या यशापयाचा त्यांनी विचार केला नाही.
‘उदय शेट्टी’चा प्रभाव…
* एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच हिंदी चित्रपटांनी व्यावसायिक मसाला चित्रपटांवर जोर द्यायला सुरुवात केली.
* रामगोपाल वर्मा, प्रकाश झा, मिलन ल्युथारिया, शिमित अमिन या काहीशा वेगळ्या वाटेने जाऊ पाहणार्या दिग्दर्शकांनी वास्तव घटनांवरून प्रेरित होऊन केलेल्या मनोरंजक चित्रपटांचा नाना पाटेकर हे महत्त्वाचा भाग होते. त्यात ‘तरकीब’, ‘शक्ती : द पॉवर’ अशा तद्दन मसालापटांचाही समावेश होता. पण, त्याचबरोबर ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘अब तक छप्पन’, जॉन अब्राहमबरोबर केलेला ‘टॅक्सी नं. ९२११’, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ अशा काही निवडक चित्रपटांमधून नाना पाटेकर यांच्या खूप चांगल्या भूमिका प्रेक्षकांच्या वाट्याला आल्या. अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘वेलकम’ मधील उदय शेट्टीने नानांमधील विनोदी अभिनेताही दाखवून दिला.
* समाजमाध्यमांच्या युगात हरएक मीम्सचा आधार हा उदय शेट्टीचे गाजलेले संवाद आणि त्यांच्यावर चित्रित झालेली दृश्ये आहेत. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या लाईव्ह ॲनिमेशनपटाच्या हिंदी आवृत्तीत ‘शेरखान’ला नानांनी दिलेला आवाजही आबालवृद्ध विसरू शकणार नाहीत.
‘मी उद्या असेन की नाही माहीत नाही!’
पणजी : “मी उद्या येथे असेन की नाही हे मला माहीत नाही…” नाना पाटेकर यांनी ४ ऑक्टोबरला पणजीजवळच्या डोना पाउला येथे एका सामाजिक कार्यक्रमात भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी केलेले हे विधान आता श्रोत्यांना राहूनराहून आठवत आहे. सम्राट क्लब इंटरनॅशनलमध्ये आयोजित या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपले मित्र दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे स्मरण केले. त्यावेळी ते म्हणाले, “आपल्याला कधी ना कधी जायचे आहे. मी उद्या असेन की नाही, मला माहीत नाही. ही वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. पण ती वेळ येण्यापूर्वी (आपल्याला असा विचार करायचा आहे की) मला जे करायचे आहे ते करण्याची क्षमता माझ्याकडे आहे का? मी त्यासाठी प्रयत्न केले आहेत का?” मनोहर पर्रिकर यांची आठवण काढताना नाना म्हणाले की, “पर्रिकर हे प्रत्येकाला अभिमान वाटावे अशी व्यक्ती होते. ते माझ्यापेक्षा तरुण होते. मी आता ७६ वर्षांचा आहे, नंतर ७७ वर्षांचा होईन. पण ते इतके थोर व्यक्ती होते की आपल्याला त्यांचा आदरच वाटतो. अशी व्यक्ती येथे जन्मली हे आपले सुदैव. हे लोक एखादी मोहीम हाती घेतल्यासारखे जगले.” हा कार्यक्रम संपल्यानंतर नाना पाटेकर यांनी स्थानिक कलाकारांबरोबर शामेल हे पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आणि देखणी हे लोकनृत्य करण्याचाही आनंद घेतला होता.
