नानासारख्या मनस्वी कलाकाराचे जाणे हे समजून घेण्याच्या पलीकडे आहे. तो एक मनस्वी माणूस होता. माझा त्याच्याशी सबंध एक अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने आला. ‘प्रहार’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने मी त्याच्या जवळ आलो. त्या चित्रपटात मी एक भूमिका केली होती. त्यावेळी अनेकांनी मला नाना किती लहरी आणि अहंकारी आहे वगैरे गोष्टी सांगितल्या सांगितले होत्या. पण, त्यावेळी मला उलट अनुभव आला. म्हणजे खरेतर या चित्रपटाच्यावेळी मीच काय तो जहालपणे वागलो असेन. त्याने तर एक अभिनेता म्हणून मला अगदी फुलाप्रमाणे जपले.
‘प्रहार’ १९९१ साली प्रदर्शित झाला, त्याच्या दोन वर्ष आधी माहिमच्या घरी मी नानांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मला कमांडोची भूमिका दिली होती, पण त्यानंतर जवळपास दीड वर्ष चित्रपट लांबला आणि मला पुन्हा जेव्हा त्याने चित्रिकरणासाठी बोलावले तेव्हा मी काविळीने आजारी होतो. माझी अवस्था पाहिल्यावर त्याने मला कमांडोची भूमिका देता येणार नाही, असे स्पष्ट केले. अरे, कमांडोच्या भूमिकेसाठी प्रत्येकाला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे आणि तुला या अवस्थेत प्रक्षिणासाठी घेऊन जाणे म्हणजे एकप्रकारे तुझा जीव घेण्यासारखे आहे, असे त्याने सांगितले. पण, मला या चित्रपटात काम करायची किती इच्छा आहे हे माझ्या नजरेतूनच त्याला कळले होते. त्यामुळे मी तुला चित्रपटातून बाहेर जाऊ देणार नाही, असे आश्वासन देत त्याने मला या चित्रपटात नायिकेच्या म्हणजेच माधुरी दीक्षितच्या भावाची भूमिका देऊ केली.
तशी ‘प्रहार’मधली माझी भूमिका छोटेखानी आहे, पण ती उत्तम वठावी यासाठी त्याने त्यातली महत्वाची दृश्ये माझ्याकडून विविध प्रकाराने करून घेतली. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत ‘प्रहार’ चित्रपटातली माझी भूमिका आणि वडील-मुलाच्या नात्यावर आधारित असलेले एक दृश्य हे सर्वोत्तम आहे, असे मी मानतो. एक अभिनेता आणि एक दिग्दर्शक म्हणून नाना किती वेगळा आहे, त्याच्या कामाच्या पध्दतीत किती अंतर आहे आणि तो स्वत: चित्रपटात विविध प्रयोग करण्यासाठी किती प्रयत्नशील असतो, हे मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभवले. स्वत: दिग्दर्शनाची धुरा त्याने खांद्यावर घेतली होती आणि तरीही चित्रपटासाठी त्याने जाऊन तीन वर्ष सैनिकी प्रशिक्षण घेतले, यातून त्याची झोकून काम करण्याची वृत्ती सहज दिसून आली.
त्या अर्थाने कलाकार म्हणून पुन्हा कधी नानाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नाही, पण नानाला केव्हाही भेटल्यावर तो आत्मीयतेने चौकशी करायचा. मी नवीन काय करतो आहे, हे त्याला जाणून घ्यायचे असायचे. गणेशोत्सवात मी त्याच्या घरी एकदा केके वगैरे कलाकार मंडळींना घेऊन गेलो होतो. तेव्हा तिथेही त्याच्या छोट्याशा घरात गणपतीचे निगुतीने करताना, आम्हाला प्रसाद देण्यापासून पोटभर जेवायला घालणे, गप्पांचा अखंड ओघ… त्या ओघात काय करतो आहेस म्हणत माहिती घेण्याबरोबरच सहज काढलेले विनोदी चिमटे हे सगळे मी कधीही विसरू शकत नाही. एक अभिनेता म्हणून तर त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. प्रत्येकवेळेला त्याचे काम पाहिल्यानंतर, त्याला भेटल्यानंतर मला असे वाटत आले आहे की नाना पुढे गेला तरी तो मागे उरतो. एक खूप छान वाक्य आहे, हत्ती जेव्हा डौलात चालत पुढे जातो तेव्हा मागे त्याची तेवढीच भव्य मोकळी जागा उरते. त्या अर्थाने, नाना हा या काळातून जाणेच शक्य नाही. तो काळाच्या पटलावर कोरला गेला आहे, असे मला वाटते.
नानाचा कुठलाही चित्रपट असो, त्यातले संवाद तुम्हाला ऐकवणे हा त्याचा खाशा दंडक होता. म्हणजे अमोल पालेकर यांच्या ‘थोडासा रुमानी हो जाए’ मधले त्याचे संवाद, त्याची कविता त्याने मला कित्येकदा ऐकवली होती. म्हणजे त्याच्याच घरी त्याच्याच तोंडचे संवाद ऐकता ऐकता, मध्येच कधीतरी तो फ्रीजमधून जेली काढणार आणि तोंड उघड रे… म्हणत तुमच्या तोंडात सरकवणार. आवडीचे पदार्थ खायला घालणार. त्याच्या या आठवणी कधीही न पुसल्या जाणार्या… म्हणजे मला नेहमी असे वाटायचे की हा ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आला असेल, त्यांच्याशी तो वडिलकीच्या, भावा-बहिणीच्या नात्याने आणि मायेनेच वागला असणार. मित्र म्हणून त्याचे प्रेम मर्यादित करणे अशक्यच… नाना पाटेकर याच्यासारखा मनस्वी माणूस कधीही पुसला जाणार नाही. त्याचे संवाद, त्याची वक्तव्ये, त्याचा अभिनय सगळे पुन्हा पुन्हा या वातावरणात रुंजी घालत राहतील, आठवत राहतील, तो खरा कालातीत असा कलाकार आहे.
