गिरीश कुलकर्णी, (लेखक, अभिनेता, दिग्दर्शक)
नानांचे जाणे हे अनेक अर्थांनी समाजाचा तोटा आहे. व्यक्ती म्हणून माझ्या क्षेत्रातील, माझ्या कलेतील एक मानदंड हरपला. सामाजिक पातळीवर राजकीयदृष्ट्या सोयीस्कर नसलेले सत्य सांगणारा एक बळकट आवाज म्हणजे नाना पाटेकर होते. लोकशाहीच्या धबडग्यात न्यायप्रक्रिया थोडीशी दिरंगाईची होते, तिचा योग्य माणसाकडे अनेकदा कानाडोळा होतो. शेतकरी घटकासाठी त्यांनी उभे केलेले ‘नाम फाउंडेशन’सारखे काम, समाजाचे लक्ष वेधायचा केलेला प्रयत्न हे स्तुत्य होते, आदर्शवत होते. नाना म्हणजे विचारांचे मोहोळ होते. त्यांच्यात तुम्हाला दर वेळी भावतील असे विचार नव्हते. त्यांचा डंख कधी कधी त्रस्त करत असे. पण, त्यांनी स्वत:ची ऊर्मी दडपली नाही.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नाना परदेशात असते, तर तिथे त्यांच्या कलेला उठाव देणारे काम घडले असते. दुर्दैवाने, अजूनही आपल्याकडे त्या अर्थाने त्यांच्यातील कलेची, त्यांच्यासारख्या अनवट कलाकाराची किंमत होत नाही. पण टॉम हँक्स, डॅनियल डे लुइस यांच्यासारख्या महानतम अभिनेत्यांसारखे विविधरंगी काम नाना करू शकले असते. अर्थात, त्यांनी आजवर मजेशीर काम केले आहे. स्वत:चा स्वतंत्र विचार असणारा माणूस आपल्यातून गेला आहे, अशी माणसे कमी होत आहेत, हा सर्वांत मोठा तोटा आहे.
नानांनी ‘देऊळ’ चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटावेळच्या खूप आठवणी आहेत. ‘देऊळ’ चित्रपटाची संहिता लिहीत असताना जवळपास सहा महिने रोज नानांना भेटत होतो. ते स्वत: स्वयंपाक करून खाऊ घालायचे. चिकन करण्यात त्यांचा हातखंडा होता. नानांना कवितेची असलेली समज फार दुर्मीळ होती. अनेक कवी त्यांना मुखोद्गत होते. खानोलकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, इंदिरा संत अशा कित्येक कवींच्या कविता म्हणून दाखवायचे, कवितेचा अर्थ समजावून सांगायचे. एखाद्या प्राध्यापकासमोर, तत्त्वज्ञासमोर बसलो आहे की काय, असे वाटायचे.
नाना पाटेकर या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. प्रेक्षक म्हणून आम्हीही पुन:पुन्हा त्यांच्या प्रेमात पडत राहिलो. आम्हाला ते सातत्याने हवेहवेसे वाटत राहिले. वय जणू वाढतच नाही की काय, अशी त्यांची ऊर्जा, विचारांचा ताजेपणा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. या निमित्ताने त्यांच्या काही विचारांपैकी, काही कामांपैकी काही तरी आमच्यात आणण्याचा प्रयत्न करू.
नाना पाटेकरांचे गाजलेल्या चित्रपटातील संस्मरणीय संवाद
* ‘कंट्रोल उदय’ हाही ‘वेलकम’मधील संवाद असो की ‘आलू लेलो, कांदा लेलो’ हा संवाद असो, सुटाबुटातील गँगस्टर भाजी विकताना पडद्यावर पाहून प्रेक्षक खूप हसले.
* ‘आ गये मेरी मौत का तमाशा देखने’
* ‘धंदे मे कोई किसी का भाई नही, कोई किसी का बेटा नहीं’ – ‘परिंदा’ (१९८९) अण्णा गँगस्टरच्या तोंडच्या या संवादांना नाना रसिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय ठरले. याच भूमिकेने त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळवून दिले.
* ‘आ गये मेरी मौत का तमाशा देखने’ – क्रांतिवीर (१९९४) – संवादाचा शस्त्रासारखा वापर करणारी संवादफेक हे नानांच्या प्रताप नारायण टिळक या भूमिकेचे वैशिष्ट्य ठरले आणि चित्रपटातील हा संवाद व्यवस्था, भ्रष्टाचार, जातीय तेढ याविरोधातील चीड व्यक्त करणारा संवाद ठरला.
* ‘बता इसमें मुसलमान का खून कौनसा और हिंदु का कौनसा?’ – ‘क्रांतिवीर’मधील नानांच्या जबरदस्त संवादातून समाजातील धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणार्यांविरुद्धचा बुलंद आवाज प्रेक्षकांसमोर आला.
* ‘‘सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान’ – ‘क्रांतिवीर’
* ‘‘ एक मच्छर साला आमदी को हिजडा बना देता है’ – यशवंत (१९९७) इन्स्पेक्टर लोहारच्या तोंडचा हा संवाद नानांच्या खास शैलीने अजरामर झाला.
* ‘‘मौत से बढकर कोई दोस्त नही है’ – गुलाम ए मुस्तफा (१९९७)
* हम सब सिस्टम का हिस्सा हैं, सिस्टम डिसाईड करता है, अपुन फॉलो करता है – अब तक छप्पन (२००४) – इन्स्पेक्टर साधु आगाशे, एन्काऊंटर स्पेशालिस्टने नानांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
* ‘भगवान का दिया सब कुछ है. दौलत है, शोहरत है, इज्जत है’ – ‘वेलकम’ (२००७) – विनोदी पद्धतीचा गँगस्टर उदय शेट्टीच्या भूमिकेतून नानांनी विनोदी शैली दाखवली.
नानाचा अभिनय जसा चटका लावणारा होता, तसाच चटका लावून नाना आपल्यातून निघून गेला. १९८०च्या दशकात समाजात जे खदखदत होते, जो राग होता त्याचे प्रतिबिंब नानाच्या रंगभूमीवरील आणि पडद्यावरील अभिनयामध्ये उमटले. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वसामान्य घरातून आलेला आणि गरिबीचे चटके सोसलेला म्हणून नानाचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो. विजय तेंडुलकरांचे ‘पाहिजे जातीचे’ आणि जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ आणि ‘महासागर’मधील त्याच्या भूमिका असोत किंवा ‘अंकुश’ आणि नंतरचे चित्रपट; आपल्या अभियनातून त्याने समाजातील रागाचे दर्शन घडविले. ‘सिंहासन’ चित्रपटापासून आमची ओळख होती. विजया मेहता यांनी त्याच्यातील कलाकार घडविला.
– सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार
****
नानांच्या जाण्याने आमच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. नानांचा परिवार संपूर्ण महाराष्ट्र आहे. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार सुखी राहिला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडे काढून ठेवली होती. आपल्याच शेतात अंत्यविधी करा, असेही त्यांनी सांगितले होते. नाना नुकताच दुष्काळ दौरा करणार होते, ती इच्छा अपूर्ण राहिली.
– गणेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘नाम फाउंडेशन’
****
नाना पाटेकर हा खर्या अर्थाने ‘लोकांचा माणूस’ होता. अभिनेते म्हणून नाना मोठे होतेच. मात्र, फार कमी अभिनेते समाजासाठी आणि लोकांसाठी झटतात. नाना त्यापैकीच एक होते. अगदी पेहेरावावरूनही त्यांचा साधेपणा कळून यायचा. कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचा प्रीमियर, नानांचा पोशाख सारखाच असायचा. मी नानांबरोबर एक चित्रपट केला होता, तेव्हा फार धमाल आली होती. कोणताही सामान्य माणूस त्यांना सहज भेटायचा. मुंबईतही अनेकदा चित्रीकरणादरम्यान वाहतूक पोलीस वैगरे नानांना भेटायला येत असत आणि नानाही अगदी आपुलीने त्यांची, त्यांच्या गावाची, तिथल्या पाण्याच्या परिस्थितीची चौकशी करायचे. नानांच्या जाण्याने एक सच्चा ‘लोकाभिमुख’ माणूस हरपला आहे.
– सुमीत राघवन, अभिनेते
****
नाना एक अविस्मरणीय नट होता. बिनधास्त, उदार आणि भल्याभल्यांना धडकी भरवणारा असा एकमेव ‘नाना’. मला आठवतंय, कर्नाटक संघात साधारण ९/११च्या हल्ल्याच्या आसपास काव्योत्सव आयोजित करण्यात आला होता. पितृपक्षामुळे सभागृह मोकळे होते. एक कन्नड कवी आणि तीन मराठी कवी आणि एक अभिनेता पाहुणा असा अभूतपूर्व ‘काव्योत्सव’ होता. किशोर कदम, अरुण म्हात्रे आणि नलेश पाटील व मी होतो. माझ्या काव्यवाचनाच्या दिवशी नाना प्रमुख पाहुणा होता. माझी ‘ओनरशिप जेल’ कविता ऐकताना नानाने अक्षरश: लोळण घेतली होती.
– अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी
