मला नग्न सत्य बोलायला आवडते व कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता मी ते बोलत असतो. आज सर्वच स्पर्धकही खूप निर्भयपणे बोलले. राजकारण्यांची नावे घेऊन त्यांनी आपले परखड विचार मांडले. भाषण सादर करताना विचार महत्त्वाचा, आवाज नाही.

सभोवतालच्या सध्याच्या सामाजिक व राजकीय स्थितीत आपण गप्प न राहता स्पष्ट व निर्भीडपणे बोलणे, व्यक्त होणे गरजेचे आहे. गप्प राहिल्याने मग सगळेच आपल्या माथी येते व आपण मुकाट सहन करत राहतो. ही स्थिती बदलण्यासाठी दुसरा कोणी तरी येईल, याची वाट न पाहता आपले सूर्य आपणच व्हा, किरणांची अपेक्षा करू नका.

जगज्जेता सिकंदर एकदा घोड्यावरून जात असताना वाटेत त्याला एक वृद्ध माणूस रस्त्यात बसलेला दिसला. सिकंदराने त्याला काय हवे ते माग, असे सांगितले. त्या वृद्धाला तो सिकंदर आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे तो वृद्ध सिकंदराला म्हणाला, ‘‘जरा बाजूला होता का, तुम्ही वाटेत उभे राहिल्यामुळे मी जे ऊन खात आहे ते अडले आहे, आमच्या वाट्याचे ऊन तरी घेऊ नका,’’ असे त्याने सांगितले. सरकार काही तरी करील, असा विचार न करता एक तरी खड्डा आपणच बुजवा.

(‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर यांनी विचार मांडले.)

ऐश्वर्याचा खरा अर्थ समजला!

अलीकडे लोक ‘गाडी आणि बायकोची साडी’ अशा कूपमंडूक वृत्तीतच जगू लागले असून त्यालाच ते ‘ऐश्वर्य’ समजू लागले आहेत. पण खरे ऐश्वर्य काय असते ते लोकांसाठी झटणार्‍यांना पाठबळ देणार्‍या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे समजले आणि उद्याच्या जगण्यासाठी एक कारणही मिळाले.

मानसन्मानासाठी मोठमोठे लोक केविलवाणे होताना आपण पाहत आहोत. किती संचय करायचा याची काही तरी मर्यादा हवी, तुमची पुढची पिढी लुळीपांगळी आहे का? ‘सर्वकार्येषु’सारख्या उपक्रमांमुळे आपल्यातलं कोतेपण समजतं आणि जगण्याला कारण मिळतं.

आपलं दु:ख जवळ कवटाळून बसलो की ते डोंगराएवढं मोठं वाटतं. पण ते दुरून पाहिलं की मात्र इतकंसंच वाटतं. तुम्ही तर स्वत:चं दु:ख तुडवत इतरांना जगण्याची उमेद दिली. तुमच्यासारख्या व्यक्तींच्या सहवासात आलं की मलाही जगण्याचं कारण मिळतं.

देवासारखी माणसं भेटत गेली. त्यामुळे देवळात कधी गेलो नाही. आज आणखी दहा देवमाणसे भेटल्याने जगण्याची उमेद शतपटीने वाढली. हल्ली माध्यमांत पांडवांबद्दल कमी व कौरवांबद्दल जास्त बोलले जाते. भावनांना, उद्रेकांना मोकळी वाट करून देण्यासाठी अभिनय हे माध्यम म्हणून वापरतो. धन्यवाद, आभार काही म्हणणार नाही. उत्तम कार्याची ओळख करून देणे हे वृत्तपत्रांचे कामच आहे.

(‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात केलेले भाषण)

पाणीतळमळ असलेल्यांचा सेतू तयार होईल!

अनेक संघटना शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करतात. शेतकर्‍यांचे हित हीच सर्वांची भावना असते. पाणीसमस्या सोडविण्यासाठीही अनेक जण काम करीत असतात. सर्वांचे काम चांगलेच असते. आज ना उद्या सारे जण एकत्र येऊन हे काम करतील, आणि पाणीसमस्या सोडविण्याची तळमळ असलेल्यांचा सुंदर सेतू तयार होईल.

तीन-साडेतीन वर्षांपूर्वी गाडी घेण्यासाठी पैसे साठविले होते. एके दिवशी शेतकर्‍याच्या आत्महत्येचे वृत्त पाहत असताना त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांत मुलगा गेल्याच्या दु:खापेक्षाही संध्याकाळची भ्रांत पाहिली व पैसे साठवून गमती करण्याऐवजी हे पैसे समाजासाठी देऊन टाकू असे वाटले. मकरंद अनासपुरेला फोन केला. त्याला सांगितले की, प्रत्येक कुटुंबाला १५ हजार याप्रमाणे एक हजार धनादेश मी देतो ते या कुटुंबीयांना दे. दीड कोटींच्या धनादेशांचे वाटप झाले. तेथून ‘नाम फाऊंडेशन’चे काम सुरू झाले.

हे काम आम्ही प्रसिद्धीसाठी केले नाही. कामामुळे एक समाधान मिळाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करतानाच या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न फाऊंडेशनने केला. 

(‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या ‘आव्हान पाणीप्रश्नाचे’ या संवाद सत्रात नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेल्या भावना.)