८ ऑक्टोबरच्या सकाळी नाना गेल्याची बातमी समजली आणि क्षणभर मन सुन्न झालं. माणसं जातात, हे वास्तव माहीत असतं; पण काही माणसं आपल्या मनात इतकी जिवंत असतात की त्यांच्या जाण्याची कल्पनाही करवत नाही. नाना त्यांतलाच एक.

तो पंचाहत्तर वर्षांचा झाला होता, यावरच विश्वास बसत नाही. मग त्याचं असं अकाली जाणं कसं पचवायचं? जगासाठी तो नाना पाटेकर, एक विलक्षण अभिनेता. माझ्यासाठी आणि आनंदवनातल्या असंख्य माणसांसाठी मात्र तो केवळ ‘नाना’ होता; आमचा नाना!

माझ्या आठवणीप्रमाणे १९७८-७९ च्या सुमारास नाना आनंदवनात नियमितपणे येऊ लागला. बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने तो इतका भारावला होता की त्यांना त्याने आईवडिलांचंच स्थान दिलं. बाबाही त्याला आपला तिसरा मुलगा मानत.

एकदा तर त्याने बाबांना आपण आनंदवनातच राहून इथल्या कामात आयुष्य घालवण्याची इच्छा बोलून दाखवली. पण बाबांनी त्याला त्याच्यातील कलागुणांची जाणीव करून दिली. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वेदना आणि विसंगतींना वाचा फोड, असं सांगून त्याला वेगळी वाट दाखवली. पुढे नानाने आपल्या अभिनयातून आणि सामाजिक कार्यातून बाबांची ही शिकवण जपली.

जशी मी माझ्या वडिलांना ‘दादा’ अशी एकेरी हाक मारतो, तसाच नानालाही लहानपणापासून ‘नाना’ म्हणत आलो. त्यात वयाचं अंतर नव्हतं, औपचारिकता नव्हती. धूलिवंदनाच्या दिवशी मला खांद्यावर घेऊन बेभान नाचणारा नाना आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. माझं घरातलं नाव ‘मुन्ना’. नानासाठी मी कायम ‘मुन्न्या’च राहिलो. कित्येक वर्षांनी भेटलो, अगदी चारचौघांत भेटलो, तरी आधी कडकडून मिठी आणि मग त्याच्या त्या विशिष्ट आवाजात मोठ्याने हाक, ‘‘मुन्न्या!’’ त्या एका हाकेत वर्षानुवर्षांचं अंतर क्षणात मिटून जायचं.

नानाची सार्वजनिक प्रतिमा काहीशी वेगळी होती. कुणाला तो विक्षिप्त वाटायचा, कुणाला त्याची भीती वाटायची. कधी कुणाला काय सुनावेल, याचा नेम नसायचा. पण आनंदवनात आणि हेमलकसात वावरणारा नाना अगदी निराळा होता. आमटे कुटुंबाशीच नव्हे, तर इथल्या रहिवाशांशी त्याचं स्वतंत्र नातं होतं. अनेकांना तो नावानं ओळखायचा; गबने, ताजणे, कडू, समुद्रे असे कितीतरी! भेटल्यावर आवर्जून मिठी मारायचा. आमच्या रहिवाशांसाठी ‘नाना येणं’ म्हणजे ‘पर्वणी’च असायची. प्रत्येकाला त्याला भेटायचं असायचं, फोटो काढायचा असायचा. नानाही कधी कंटाळायचा नाही. प्रत्येकाला मन भरेपर्यंत भेटू द्यायचा. इथे त्याला प्रसिद्धीचा बडेजाव नव्हता; होती ती केवळ आपुलकी.

नानाच्या स्वभावाचा एक प्रसंग आजही आठवतो. बहुधा नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला चंद्रपूरला ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग होता. नागपूरहून चंद्रपूरला जाताना नाना आणि सहकलाकार आनंदवनात थांबले. सगळे बसमधून उतरले; मात्र त्यांच्यातील एक अभिनेत्री खाली उतरायलाच तयार नव्हत्या. कुष्ठरोगग्रस्त माणसांविषयी वाटणारी घृणा हे त्यामागचं कारण होतं. नाना आणि मंडळी जवळपास तीन तास आनंदवनात होती. त्या मात्र बसमध्येच बसून राहिल्या. आम्हाला सुरुवातीला याची कल्पनाही नव्हती. नानाही आधी काही बोलला नव्हता. मात्र निरोपाच्या वेळी तो अचानक तिरीमिरीत बसमध्ये चढला आणि आपल्या खास रांगड्या ‘पाटेकरी’ भाषेत त्याने त्या अभिनेत्रीला शिव्यांची लाखोली वाहात चांगलंच सुनावलं!

बाबांचा विचार त्याने त्यांना ठणकावून सांगितला- शरीराचा महारोग बरा करता येतो; पण तुझ्या आणि तुझ्यासारख्या अनेकांच्या मनातल्या विकृतीचा महारोग जोवर बरा होत नाही, तोवर उपेक्षितांना न्याय मिळणार नाही. नानाच्या संतापामागे अशा वेळी केवळ राग नसायचा; माणसाचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेविषयीची विलक्षण तळमळ असायची. बाबा पैलवान होते आणि नानाही पैलवान होता. विशेष म्हणजे दोघेही शरीराने जितके पैलवान, तितकेच मनानेही! अन्याय दिसला की अस्वस्थ होणं, प्रस्थापित चौकटींना आव्हान देणं आणि प्रसंगी एकट्यानं उभं राहणं, हा दोघांमधला समान धागा होता. म्हणूनच हे भावबंध इतके घट्ट जुळले असावेत.

हेमलकसाशीही नानाचं तितकंच जिव्हाळ्याचं नातं होतं. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो’ या चित्रपटात प्रकाशकांची भूमिका साकारणं हा त्याच्यासाठी केवळ अभिनय नव्हता. ज्या कार्याशी तो अनेक दशकं भावनिकरीत्या जोडला गेला होता, ते कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती संधी होती. बाबांच्या आणि साधनाताईंबद्दल आणि आनंदवन-हेमलकसाच्या कार्याबद्दल बोलताना त्याच्या शब्दांत नेहमीच एक विलक्षण आदर जाणवायचा.

नानाचे फोनही त्याच्यासारखेच अनपेक्षित असायचे. वर्षा-दोन वर्षांनी अचानक फोन येई. ‘‘काय मुन्न्या, कसा आहेस? विकास, भारती, सगळे कसे आहेत?’’ मग अर्धा-पाऊण तास गप्पा. ‘‘मी लवकरच येतोय,’’ असं सांगता सांगता एखाद्या नवीन कामाची माहिती द्यायचा. एकदा म्हणाला, ‘‘ईशान्य भारतात शाळा बांधतोय.’’ मी विचारलं, ‘‘अरे नाना, ईशान्य भारत कुठून मध्येच?’’ त्यावर लगेच उत्तर, ‘‘बाबांनी विश्वबंधुत्व शिकवलं, विसरलास का? आपले शेतकरी जसे आपले, तशी तिकडची पोरंही आपलीच! फार हाल आहेत रे त्यांचे. जाऊन पाहिलं आणि ठरवलं, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा उभारायची.’’ त्याचं बोलणं सुरूच राहायचं. मग पुन्हा वर्ष-दोन वर्षं नाना परत गायब! आपण फोन केला तर त्याला गाठणं जवळपास अशक्य. बोलणं व्हायचं ते त्यानेच फोन केल्यावर!

भारतीय सैन्यदलाविषयीची त्याची आत्मीयता सर्वश्रुत आहे. ‘प्रहार’सारखा चित्रपट निर्माण करताना त्याने स्वतः कठोर लष्करी प्रशिक्षण घेतलं. सैनिकांच्या भूमिका साकारणाऱ्यांकडूनही तशाच तयारीचा आग्रह धरला. कारगिल युद्धाच्या काळात प्रत्यक्ष सैनिकांबरोबर राहून त्याने सेवा बजावली. पुढे ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांतही स्वतःला झोकून दिलं. नानासाठी देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी या केवळ बोलण्याच्या गोष्टी नव्हत्या.

अलीकडच्या वर्षांत नाना खूप निवळला होता. पूर्वीचा आक्रमकपणा कमी झाला होता, स्वभावात शांतपणा आला होता. पण, शरीराची आणि मनाची तंदुरुस्ती, त्याची शिस्त आणि जगण्याची ऊर्मी कायम होती. म्हणूनच त्याच्या जाण्याचा धक्का इतका तीव्र आहे. शेवटचा आनंदवनात आला तो करोनाच्या थोडं आधी. त्यानंतर आमची भेट नाही. नानाच्या मागे आता नीलकांती पाटेकर-आमची नीलूआत्या आणि मल्हार आहेत. त्यांचंही बाबा, साधनाताई आणि

आनंदवनाशी असलेलं नातं तेवढंच भावोत्कट आहे. नानाच्या जाण्याने केवळ त्याचं कुटुंब नव्हे, तर आनंदवन आणि हेमलकसाचा हा विस्तारित परिवारही आज पोरका झाला आहे.

२५ डिसेंबर १९८० रोजी नानाने बाबांना एक छोटीशी कविता लिहून पाठवली होती. त्यात तो म्हणतो…

हरवलंय.

म्हणून हुडकणंच संपावं का?

हुडकणं हा भोग

आणि

हरवणं हे प्राक्तन

असं म्हटलं तर?

तर या चार ओळी

इथंच संपाव्यात.

चार दशकांहून अधिक काळापूर्वी बाबांना लिहिलेल्या या ओळी आज मनाला विलक्षण चटका लावून जातात. हरवणं हे प्रारब्ध असेलही; पण म्हणून हरवलेल्या माणसाचा शोध थांबवायचा असतो का? नानाला आता आम्ही त्याच्या आठवणींत, त्याच्या कडकडून मारलेल्या मिठ्यांत, त्याच्या रांगड्या शब्दांआड दडलेल्या मायेच्या ओलाव्यात आणि आनंदवनातल्या असंख्य माणसांच्या मनांत शोधत राहणार आहोत. कधीकाळी आनंदवनातच राहण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नानाला बाबांनी जगात पाठवलं होतं. आता त्याच्या स्मरणार्थ बाबा आणि साधनाताईंच्या स्मृतिस्थळाजवळ आम्ही वडाचं एक रोपटं लावणार आहोत. पुढे त्याचा वटवृक्ष होईल. त्याच्या सावलीत नाना पुन्हा आपल्या माणसांमध्ये असेल. बाबा-ताईंच्या सान्निध्यात त्याचं वास्तव्यही कायमचं असेल.

नानाला आनंदवनाची हीच श्रद्धांजली आणि माझ्यासाठी? माझ्या कानांत त्याची ती हाक कायम घुमत राहील- ‘‘काय मुन्न्या….!’’

कौस्तुभ विकास आमटे, पूर्णवेळ कार्यकर्ता, आनंदवन

ई-मेल: kaustubh.amte@maharogisewasamiti.org